भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये दोन कसोटी सामने पार पडले आहेत आणि यामध्ये दोन्ही संघाची आतापर्यत १-१ अशी बरोबरी आहे. १५ फेब्रुवारी रोजी तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी राजकोटमध्ये दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. त्याचबरोबर या मालिकेतील शेवटच्या ३ कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहली या १७ सदस्यीय भारतीय संघात नाही. खरंतर विराट कोहली वैयक्तिक कारणांमुळे खेळत नसल्याचे बोलले जात आहे.
पार पडलेल्या पहिल्या आणि दुसऱ्या कसोटी सामन्यांमध्ये भारताचा माजी कर्णधार विराट कोहली खेळला नाही. भारत-इंग्लंड मालिका सुरू होण्यापूर्वी विराट कोहलीने पहिल्या २ कसोटी सामन्यांमधून आपले नाव मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या मालिकेतील शेवटच्या ३ कसोटी सामन्यांमध्ये विराट कोहली खेळेल असे मानले जात होते. मात्र, भारतीय चाहत्यांची निराशा झाली आहे. विराट कोहली वैयक्तिक कारणांमुळे खेळू शकणार नाही. विराट कोहलीच्या १३ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत हा खेळाडू एकही कसोटी सामना खेळू शकला नसल्याची ही पहिलीच वेळ आहे.
हैदराबादमधील पराभवानंतर टीम इंडियाचा पलटवार…
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी हैदराबाद येथे खेळली गेली. या कसोटीत बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील ब्रिटिशांनी भारतीय संघाचा २८ धावांनी पराभव केला. मात्र यानंतर टीम इंडियाने दुस-या कसोटीत शानदार पलटवार केला. विशाखापट्टणम कसोटीत भारतीय संघाने इंग्लंडचा १०६ धावांनी पराभव केला. आता हे दोन्ही संघ १५ फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये आमनेसामने येणार आहेत. यानंतर चौथी कसोटी रांचीमध्ये खेळवली जाईल. तर शेवटच्या कसोटीसाठी दोन्ही संघ धर्मशाला येथे आमनेसामने असतील.