मुंबई : कतार येथे सुरु असलेली फिफा विश्वचषक स्पर्धा आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. फिफा विश्वचषक २०२२ चा अंतिम सामना येत्या १८ डिसेंबरला होणार असून यात अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स या संघानमध्ये लढत होणार आहे. दोन्हीही संघ यंदाचा विश्वचषक नावावर करून घेण्यासाठी प्रयत्न करणार असून खेळाडूंमध्येही यंदाचा ‘गोल्डन बूट’ पटकावण्यासाठी चुरस पहायला मिळत आहे. फिफा विश्वचषकात ‘गोल्डन बूट’ हा अवॉर्ड स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला दिला जातो.
फुटबॉलमधील गोल्डन बूट हा पुरस्कार अधिकृतपणे १९८२ साली सुरू झाला. आधी त्याचे नाव गोल्डन शू होते पण २०१० मध्ये ते बदलून गोल्डन बूट करण्यात आले. गोल करण्याच्या बाबतीत, दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूला सिल्व्हर बूट आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूला कांस्य बूट मिळतो. २०१० मध्ये गोल्डन बूट जर्मनी थॉमस मुलर, २०१४ कोलंबिया जेम्स रॉड्रिग्ज, २०१८ इंग्लैंड हैरी केन यांनी पटकावला होता.
यंदा फिफा विश्वचषक २०२२ मध्ये गोल्डन बुटच्या रेसमध्ये एम्बाप्पे आणि लिओनेल मेस्सी यांच्यात काटे की टक्कर आहे. मात्र या दोघांनाही त्यांच्या देशातूनच स्पर्धा निर्माण झाली आहे. फिफा वर्ल्डकपमध्ये फ्रान्सच्या एम्बाप्पेने सर्वाधिक ५ गोल मारले आहेत. तो सध्या गोल्डन बूट पटकावण्याच्या रेसमध्ये आहे. दुसरीकडे फ्रान्ससोबत फायनल खेळणाऱ्या अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी देखील ५ गोल मारून आपली भक्कम दावेदारी सादर करत आहे. जरी मेस्सी आणि एम्बाप्पे गोल्डन बूटच्या रेसमध्ये आघाडीवर असले तरी अर्जेंटिनाच जुलियन अल्वारेझ देखील या दोघांना मागे टाकून गोल्डन बूट पटकावू शकतो. त्याने आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये 4 गोल केले आहेत. अल्वारेझ सोबतच फ्रान्सचा गिरूडने देखील यंदाच्या वर्ल्डकपमध्ये 4 गोल केले आहेत. त्यामुळे तो देखील गोल्डन बूटसाठी अंतिम सामन्यात आपली दावेदारी ठोकू शकतो.