नवी मुंबई– पुरुषांच्या आयपीएलप्रमाणे महिलांच्या WPL ला देखील क्रिकेटप्रेमीकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. काल नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबईने (Mumbai Indians ) दिल्लीचा (Delhi Capitals) आठ विकेटसनी पराभव केला. त्याचबरोबर या हंगामातील सलग तिसरा विजय मिळवला, त्यामुळं आता गुणतालिकेत मुंबई इंडियन्स अव्वल स्थानी आहे. मुंबईचा पुढील सामना १२ मार्चला यूपी वॉरियर्सशी होणार आहे. तर उद्या दिल्ली कॅपिटल्स संघ ११ मार्च रोजी गुजरात जायंट्सशी भिडणार आहे. मुंबई आणि दिल्ली संघात स्पर्धेतील सातवा सामना पार पडला. या सामन्यात मुंबईने दिल्लीवर आठ विकेट्सने शानदार विजय मिळवला.
दिल्लीचे फक्त 106 धावांचे आव्हान
दरम्यान, दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीचा संघ १८ षटकांत सर्वबाद १०५ धावांवर आटोपला. मुंबईने १५ षटकांत २ बाद १०९ धावा करत सामना जिंकला. दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबईला विजयासाठी १०६ धावांचे लक्ष्य दिले होते. दिल्लीकडून कर्णधार मेग लॅनिंगने सर्वाधिक ४३ धावा केल्या. जेमिमा रॉड्रिग्जने २५ आणि राधा यादवने १० धावांचे योगदान दिले. या तिघीव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला दुहेरीआकडा गाठता आला नाही. प्रत्युतरात मुंबईने २ बाद १०९ धावा केल्या.
मुंबईने साकारला सहज विजय…
विजयासाठी १०६ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या मुंबई इंडियन्सन अगदी सहज विजय मिळवला. यस्तिका भाटियाने फलंदाजीत सर्वाधिक ४१ धावा केल्या. हेली मॅथ्यूजने ३२ धावांचे योगदान दिले. नताली सीव्हर २३ आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने ११ धावा करून नाबाद राहिली. तर गोलंदाजीत गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. सायका इशाक, इस्सी वाँग आणि हीली मॅथ्यूजने प्रत्येकी तीन बळी घेतले.