
मुंबई– क्रिकेट (Cricket) हा भारतीयांचा धर्म आहे असं मानलं जातं. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात क्रिकेटवेडे आहेत. क्रिकेट सामने पाहणे म्हणजे पर्वणीच असते. त्यात २००८ सालापासून आयपीएलमुळं (IPL) क्रिकेट अधिक फास्ट झाले आहे. इंडियन प्रीमिअर लिगमुळं अनेक नवोदित क्रिकेटपटूंना संधी मिळाली. कित्येक क्रिकेटपटू नावारुपाला आले. याच आयपीएलच्या धर्तीवर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) बीसीसीआय वतीने पहिल्या सत्राच्या महिला प्रीमियर लीगचे (Women Premier League) आयोजन करण्यात आले आहे.
आज मुंबईत लिलाव…
दरम्यान, पहिल्या महिला क्रिकेट प्रीमियर लीग लिलाव प्रक्रिया आज मुंबईत पार पडणार आहे. ४ मार्चपासून या महिला प्रीमियर लीगला सुरुवात होत आहे. याच लीगसाठी आज सोमवारी लिलाव प्रक्रिया होणार आहे. या पहिल्या सत्रातील लीगसाठी जवळपास १५२५ महिला क्रिकेटपटूंनी आपल्या नावाची नोंद केली होती. यातून ४०९ खेळाडूंची निवड करण्यात आली.
भारतातील 246 व विदेशातील 163 खेळाडू
या वर्षी पहिल्यांदाच महिलांची प्रीमियर लीग पार पडत असल्यामुळं क्रिकेटप्रेमीना याची उत्सुकता लागली आहे. या लीगमध्ये भारतातील २४६ आणि विदेशातील १६३ खेळाडूंचा समावेश आहे. यांच्यावर बोली लागणार आहे. यादरम्यान स्मृती मानधनासह महाराष्ट्राच्या २५ महिला खेळाडूंची लिलावासाठी निवड झाली आहे. स्मृतीवर मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. तर अनेक नवोदित महिला खेळाडूंचा पण समावेश असल्याचं बोललं जात आहे. पण कोणत्या महिला खेळाडूवर अधिक बोली लागते याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.