राष्ट्रकुल स्पर्धेत (Commonwealth Games 2022) कुस्तीपटुंकडुन भारताला मिळणाऱ्या पदकांची संख्या आता वाढतच चालली आहे. भारताची दिग्गज कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) हिने सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेच्या ५३ किलो वजनी गटात श्रीलंकेच्या चमोदियाचा ४-१ असा धुव्वा उडवत विनेश हिने सुवर्ण पदक पटकावले आहे.
विनेशने सामन्यात सुरुवातीपासून आपल्या अनुभवाचा पुरेपुर फायदा घेत समोरच्या कुस्तीपटूवर आपला दबाव कायम ठेवला होता. ज्यामुळे आधीच आघाडी घेतलेल्या विनेशने सामना ४-१ असा जिंकत सुवर्णपदकाला गवसणी घातली. विनेशने २०१४ च्या ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत ४८ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले होते. त्यानंतर २०१८ च्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत विनेशने ५० किलो वजनी गटात सुवर्ण पदकाची कमाई केली होती. विनेशच्या या पदकाबरोबरच भारताने बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीतील पाच सुवर्णासह ९ पदके पटकावली आहे.
विनेश फोगाट ही भारताच्या अव्वल दर्जाच्या कुस्तीपटू गीता आणि बबिता फोगट यांची चुलत बहीण आहे. ती ४८, ५०, ५३ किलो कुस्तीच्या फ्रीस्टाइल प्रकारात भाग घेते असून तिने प्रो रेसलिंग लीगमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.