
फोटो सौजन्य - Social Media
राज्यातील नागरिकांसाठी अत्यावश्यक सेवा देणारे ‘आपले सरकार’ वेबपोर्टल तांत्रिक अडचणींमुळे तात्पुरते बंद पडले असले, तरी ते लवकरच पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली. पोर्टलमध्ये निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी तज्ज्ञ समिती युद्धपातळीवर काम करत असून, प्रणाली अधिक सुरक्षित आणि सक्षम करण्यावर विशेष भर दिला जात आहे.
२७ एप्रिलच्या रात्रीपासून तांत्रिक कारणांमुळे सेवा ठप्प झाल्याने जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, शिष्यवृत्ती अर्ज तसेच विविध स्पर्धा परीक्षांसाठीचे अर्ज या सेवांमध्ये अडथळे निर्माण झाले. दररोज लाखो नागरिक या पोर्टलचा वापर करत असल्याने निर्माण झालेल्या गैरसोयीची दखल घेत शासनाने तातडीने पावले उचलली आहेत.
या पार्श्वभूमीवर मंत्री शेलार यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. बैठकीस विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच महाआयटीचे पदाधिकारी उपस्थित होते. तांत्रिक अडचणींचे मूळ कारण शोधण्यासाठी आयटी तज्ज्ञ, अभियंते आणि तंत्रज्ञान प्रमुखांची विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीने प्राथमिक तपासणी पूर्ण केली असून आवश्यक सुधारणा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पोर्टल अधिक सुरक्षित, स्थिर आणि वेगवान करण्यासाठी विविध तांत्रिक सुधारणा राबविण्यात येत आहेत. यासाठी मायक्रोसॉफ्ट, डेल आणि कॉमवॉल्टसारख्या आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपन्यांच्या भारतीय प्रतिनिधींशी समन्वय साधून मार्गदर्शन घेतले जात आहे. सर्व तांत्रिक यंत्रणा आणि तज्ज्ञ टीम्स २४ तास कार्यरत असल्याची माहितीही देण्यात आली.
दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असून ‘आपले सरकार’ पोर्टल लवकरच पूर्ववत सुरू होईल, असा विश्वास मंत्री शेलार यांनी व्यक्त केला. नागरिकांनी संयम ठेवून सेवा केंद्रांशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
‘आपले सरकार’ हे राज्यातील सेवा वितरणाचे महत्त्वाचे डिजिटल व्यासपीठ असून नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी थेट संबंधित आहे. सध्याच्या तांत्रिक अडचणींवर मात करून अधिक सक्षम, सुरक्षित आणि कार्यक्षम प्रणाली उभी करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. लवकरच पोर्टल पूर्ण क्षमतेने सुरू करून नागरिकांना अखंडित सेवा देण्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.