AI चा चुकीचा वापर जगासाठी ठरतोय धोकादायक, ChatGPT बनवतोय खोटं आधार आणि पॅन कार्ड! सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
गेल्या दोन आठवड्यांपासून सर्वात वेगाने व्हायरल होणारं AI टूल म्हणजे ChatGPT. ChatGPT च्या युजर्सच्या संख्येत देखील प्रचंड वाढ झाली आहे. ChatGPT त्यांच्या युजर्सचे फोटो Ghibli स्टाईलमध्ये रुपांतिरत करून देत होता. यानंतर अनेक वाद देखील निर्माण झाले होते. हे सर्व वाद सुरु असतानाच आता एक नवीन प्रकरण समोर आलं आहे. यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की, ChatGPT खोटे आधार कार्ड आणि पॅन कार्ड देखील तयार करून देत आहे.
ChatGPT ने तयार केलेले आधार कार्ड आणि पॅन कार्ड काही प्रमाणात खऱ्या सारखे वाटत आहेत. हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. प्रश्न असा उद्भवतो की तंत्रज्ञान आपल्याला मदत करत आहे की धोक्यात आणत आहे? ही बाब केवळ आश्चर्यकारकच नाही तर विचार करायला भाग पाडणारी आहे. कारण चॅटजीपीटीच्या गैरवापरामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.(फोटो सौजन्य – Pinterest & X)
GPT-4o मॉडेलच्या लाँचिंगपासून, चॅटजीपीटीच्या इमेज जनरेशन क्षमतांनी 7000 दशलक्षाहून अधिक इमेजेस तयार केल्या आहेत. हे फीचर स्टुडिओ घिबली स्टाईल फोटोंसाठी लोकप्रिय झाले होते, परंतु आता त्याचा गैरवापर देखील केला जात आहे. सोशल मीडियावर काही लोक ChatGPT वापरून बनावट आधार कार्ड देखील तयार करत आहेत. या कार्ड्समध्ये प्रामाणिक डिझाइन, बारकोड आणि संख्या आहेत. फक्त चेहऱ्याचे वैशिष्ट्य थोडे वेगळे दिसते. पण असं करणं आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतं.
ChatGPT is generating fake Aadhaar and PAN cards instantly, which is a serious security risk. This is why AI should be regulated to a certain extent.@sama @OpenAI pic.twitter.com/4bsKWEkJGr — Yaswanth Sai Palaghat (@yaswanthtweet) April 4, 2025
केवळ आधार कार्डच नाही तर आता काही सोशल मीडिया युजर्स चॅटजीपीटी वापरून बनावट पॅन कार्ड देखील बनवत आहेत. या बनावट कार्डांमधील नावे, क्रमांक आणि डिझाइन खऱ्या कार्डांसारखेच दिसतात. Yaswanth Sai Palaghat नावाच्या एका एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ज्यामध्ये चॅटजीपीटीने खोटं पॅन कार्ड आणि आधार कार्ड तयार केलं आहे.
GPT-4o ची इमेज जनरेशन सिस्टीम पूर्वीच्या DALL-E मॉडेलपेक्षा वेगळी आहे. ते आता चॅटबॉटमध्येच प्रतिमा तयार करू शकते, युजर्सच्या भाषेच्या मागण्या अधिक खोलवर समजून घेऊन अधिक अचूक आणि फोटोरिअलिस्टिक प्रतिमा तयार करता येतात. ओपनएआयने कबूल केले आहे की GPT-4o मध्ये जास्त शक्ती आहे आणि ते अधिक धोके निर्माण करू शकते. अशा परिस्थितीत, बनावट ओळखपत्रे बनवणे ही एक गंभीर समस्या म्हणून उदयास आली आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की एआयने तयार केलेल्या या बनावट कागदपत्रांमुळे समाजात ओळख चोरी आणि फसवणूक वाढू शकते. अशा परिस्थितीत काही ठोस निर्णय घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.