Discord: Chat App वर होणार नेपाळच्या पंतप्रधानांची निवडणूक? गेमर्ससाठी लाँच केलेल्या अॅपने सर्वत्र घातला गोंधळ, नक्की प्रकरण काय?
नेपाळमध्ये अलीकडेच भ्रष्टाचार विरोधात आंदोलनं करण्यात आली. सराकरने तब्बल 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातल्यानंतर नेपाळमधील तरूण रस्त्यावर उतरले आणि त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. या आंदोलनात हजारो तरूण सहभागी झाले होते. बघता बघता आंदोलनाला हिंसक वळण आले आणि अनेक लोकांचा मृत्यू झाला. या सर्वाचा परिणाम असा झाला की, सरकार अस्थिर झाले आणि आता असा दावा केला जात आहे की, देशातील नवीन पिढी Discord सारख्या चॅट अॅपचा वापर करून नवीन पंतप्रधान निवडण्याची चर्चा करत आहेत. पण हा अॅप नक्की काय आहे, त्याचा वापर कशासाठी केला जात आहे, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.
Discord इतर प्लॅटफॉर्म्सप्रमाणे कोणतंही साधारण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नाही. Discord सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 2015 मध्ये गेमर्ससाठी लाँच करण्यात आले होते. गेमिंग दरम्यान चॅट करण्यात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी Discord लाँच करण्यात आले होते. स्टॅनिस्लाव विशनेव्स्की आणि जेसन सिट्रोन यांनी हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म डिझाईन केले आहे. लाँच केल्यानंतर सुमारे 1 वर्षाआधीच या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने 2.5 करोड युजर्सचा आकडा पार केला. कोरोनोच्या काळात हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म प्रचंड लोकप्रिय झाले. विशेषत: Gen Z याचा मोठ्या प्रमाणात वापर करू लागले. पूर्वी या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर फक्त गेमिंग दरम्यान चॅटिंगसाठी केला जात होता, परंतु नंतर लोक सामान्य गप्पांसाठी आणि वेगवेगळे सर्व्हर तयार करून त्यांच्या आवडीच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी याचा वापर करू लागले. (फोटो सौजन्य – Pinterest)
Discord चा वापर करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला सर्वर कॉन्सेप्ट समजणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करायचा असेल तर सर्वात आधी गुगल प्ले स्टोअर किंवा ऍपल ॲप स्टोअरवरून हे ॲप डाऊनलोड करावं लागणार आहे. यानंतर तुम्हाला इथे तुमचं अकाऊंट तयार करावं लागणार आहे. यानंतर, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही तुमचा स्वतःचा सर्व्हर तयार करू शकता किंवा विद्यमान सर्व्हरमध्ये सहभागी होऊ शकता.
एका Discord सर्वरला तुम्ही मोठ्या ऑनलाइन समुदायाप्रमाणे समजू शकता, इथे अनेक चॅनल देखील तयार केले जातात. या चॅनेल्सवर मजकूर, व्हिडिओ आणि फोटो सहजपणे शेअर केले जाऊ शकतात. प्रत्येक सर्व्हरमध्ये जास्तीत जास्त 5 लाख सदस्य सहभागी होऊ शकतात, परंतु एका वेळी फक्त 2.5 लाख लोक सक्रिय राहू शकतात.
Discord बाबत नेपाळमध्ये सध्या प्रचंड चर्चा सुरु झाली आहे. हे प्लॅटफॉर्म तरुण पिढीसाठी एक सुरक्षित ठिकाण बनलं आहे, जिथे तरूणवर्ग सरकारबाबत उघडपणे चर्चा करू शकतात आणि पंतप्रधान निवडीसारख्या मुद्द्यांवरही आपले मत व्यक्त करू शकतात. जरी ही फक्त अफवा असली किंवा सध्या फक्त दावे केले जात असले तरी, हे स्पष्ट आहे की Discord आता फक्त गेमिंग चॅट ॲपपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर ते हळूहळू राजकीय आणि सामाजिक वादविवादाचे एक महत्त्वाचे माध्यम बनत आहे.