फोटो सौजन्य - सोशल मिडीया
आपण आपल्या रोजच्या जीवनात सर्रास ऑनलाईन पेमेंटचा वापर करतो. आपण कोणत्याही दुकानात गेलो अगदी एखाद्या मोठ्या दुकानात किंवा एखाद्या भाजीवाल्याकडे सर्वच ठिकाणी हल्ली ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध असते. रिक्षा, टॅक्सी किंवा बसने प्रवास करताना सुध्दा आपण ऑनलाईन पेमेंटने पैसे देऊ शकतो. ऑनलाईन पेमेंटसाठी आपल्याला कोणत्याही विशेष सुविधेची गरज भासत नाही, आपण आपल्या फोन आणि इंटरनेटच्या मदतीनं अगदी सहज ऑनलाईन पेमेंट करू शकतो.
ऑनलाईन पेमेंटमुळे सुट्ट्या पैशांसाठी भांडण करावं लागत नाही, पैशे शोधण्यासाठी जास्त त्रास घ्यावा लागत नाही, केवळ फोन काढायचा आणि स्कॅनर स्कॅन करून पैसे ट्रान्सफर करायचे. ऑनलाईन पेमेंट करताना अनेक रिवॉर्डस देखील मिळतात. त्यामुळे हल्ली प्रत्येकजण रोख पैसे देण्यापेक्षा ऑनलाईन पेमेंट करणं, सोयीस्कर समजतो. पण ऑनलाईन पेमेंट करताना काही गोष्टींची काळजी घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. अन्यथा आपल्या एका चुकीमुळे बँक खातं रिकामं होऊ शकतो.
ऑनलाईन पेमेंट करताना केवळ विश्वसनीय ॲप्सचा वापर करा. ऑनलाईन पेमेंट करताना Google Pay, Phone pay, Paytm, Amazon pay यासांरख्या ॲप्सचा वापर करा. तसेच आता तुम्ही व्हॉट्सअपव्दारे देखील ऑनलाईन पेमेंट करू शकता. ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी कोणतेही अॅप वापरताना त्या अॅपला RBI ने मान्यता दिली आहे की नाही याची खात्री करा. कोणत्याही लिंकवर क्लिक करून पेमेंट करू नका.
कोणत्याही अॅपवरून ऑनलाईन पेमेंट करताना UPI पिन आवश्यक असतो. UPI पिन टाकल्याशिवाय पेमेंट करता येत नाही. त्यामुळे तुमचा UPI पिन कोणत्याही अनोळखी व्यक्तिसोबत शेअर करू नका. तुमचा पिन लीक झाला आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही तो त्वरित बदलला पाहिजे.
कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत तुमच्या बँक खात्याचे डिटेल्स शेअर करू नका. सध्या बनावट कॉल करून लोकांना त्यांचे बँक खात्याचे डिटेल्स विचारले जातात. आणि त्यानंतर सायबर चोरटे तुमचे बँक खातं रिकामं करू शकतात.
ऑनलाईन पेमेंटसाठी वापरलं जाणारं प्रत्येक अॅप अपडेट असणं आवश्यक आहे. अॅप अपडेट्स वेळोवेळी येत राहतात जेणेकरून तुम्हाला उत्तम अनुभव मिळेल.