तुर्कितील भुकंपाबाबत झाला मोठा खुलासा! Google ची 'ती' चूक झाली उघड, कंपनीने काय उत्तर दिलं? नक्की काय घडलं?
तुम्हाला आठवतंय का 2023 मध्ये तुर्कीमध्ये मोठा भुकंप झाला होता. या भुकंपाने संपूर्ण देश हादरला होता. या भूकंपाबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. 2023 मध्ये तुर्कीमध्ये झालेल्या भयानक भुकंपादरम्यान गुगलकडून एक मोठी चूक झाली. 2023 च्या या विनाशकारी भूकंपादरम्यान Google ची अर्ली वॉर्निंग सिस्टम फेल झाली आहे. हे सत्य कंपनीने देखील कबूल केले आहे आणि त्यांची चूक मान्य केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुर्कीमध्ये 2023 साली झालेल्या भुकंपादरम्यान Google ची अर्ली वॉर्निंग सिस्टम फेल झाली. यावेळी अँड्रॉइड भूकंप अलर्ट (AEA) तंत्रज्ञान प्रभावित भागातील सुमारे 1 कोटी लोकांना वेळेवर इशारा देण्यात अयशस्वी ठरले. गुगलच्या या एका चूकीमुळे अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालं. त्या दिवशी नेमकं काय झालं होतं, या सर्व प्रकरणी गुगलने काय म्हटलं आहे, याबाबत अधिक जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
तुर्कीमध्ये 6 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 4:17 वाजता 7.8 तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपावेळी Google ची सिस्टम सक्रिय होती. मात्र तरी देखील केवळ 469 लोकांनाच “Take Action” असा उच्चस्तरिय इशारा देण्यात आला, तर या क्षेत्रात राहणारे लाखो लोकांना हा अलर्ट मिळाला नाही. गुगलच्या मते, सुमारे 5 लाख लोकांना ‘Be Aware’ असा अलर्ट देण्यात आला होता जो ‘डू नॉट डिस्टर्ब’ मोडमध्येही फोन चालू करत नाही. गुगलने जगभरातील जवळजवळ 100 देशांमध्ये “ग्लोबल सेफ्टी नेट” म्हणून ही सिस्टम प्रमोट केली आहे, विशेषतः जिथे राष्ट्रीय चेतावणी प्रणाली अस्तित्वात नाही अशा ठिकाणी हि सिस्टम फायदेशीर ठरू शकते, असा दावा करण्यात आला होता.
गुगलची ही सिस्टम Android फोनमधील सेंसरच्या मदतीने भूकंपाचे झटके ओळखण्यासाठी मदत करते. भूकंपाच्या लहरी जमिनीत हळू हळू पसरतात, त्यामुळे हि सिस्टम भूकंपाची जाणीव होताच युजर्सना अॅडवांस नोटिफिकेशन पाठवते. हे नोटिफिकेशन दोन प्रकारचे असते, ज्यामध्ये Take Action आणि Be Aware यांचा समावेश आहे. ‘Take Action’ नावाचा अलर्ट सर्वात गंभीर आहे. हा अलर्ट युजरच्या फोनवर मोठा अलर्ट वाजवतो, स्क्रीन लॉक करतो आणि ‘डू नॉट डिस्टर्ब’ मोड देखील ओव्हरराइड करतो. तर दुसरा अलर्ट म्हणजेच ‘Be Aware’. हा अलर्ट केवळ फोनवर एक साधी नोटिफिकेशन पाठवतो.
परंतु तुर्कस्तानमध्ये पहिला अलर्ट पाठवण्यात आला त्यावेळी, सिस्टमने भूकंपाची तीव्रता 4.5 ते 4.9 एमएमएस असल्याचा अंदाज लावला होता. मात्र हा भूकंप प्रत्यक्षात तो 7.8 तीव्रतेचा होता. त्यामुळे गंभीर अलर्ट म्हणजेच “Take Action” अलर्ट बहुतेक लोकांपर्यंत पोहोचू शकला नाही.
तुर्कीमध्ये त्यादिवशी दुसरा मोठा भूकंप झाला. त्यावेळी देखील गुगलच्या सिस्टमने तीच चूक केली आहे आणि भूकंपाची तीव्रता कमी मोजली. यावेळी 8,158 लोकांना Take Action अलर्ट आणि सुमारे चार मिलियन यूजर्सना Be Aware अलर्ट पाठवला होता. गुगलच्या संशोधकांनी नंतर त्याच भूकंपाच्या परिस्थितीचे पुन्हा अनुकरण केले आणि असे आढळून आले की जर अल्गोरिथम आधी अपडेट केला असता तर 1 कोटी लोकांना “Take Action” आणि 6 कोटी 70 लाख लोकांना “Be Aware” असे अलर्ट मिळू शकले असते.
या सर्व प्रकरणावर स्पष्टिकरण देताना गुगलने म्हटलं आहे की, प्रत्येक मोठा भूकंप अल्गोरिथमच्या मर्यादा उघड करतो आणि आम्ही दरवेळी काहीतरी नवीन शिकतो आणि प्रणाली सुधारतो.