Grok Chat Leaked: एलन मस्कची हत्या कशी करू... गुगलवर लिक झाले Grok युजर्सचे चॅट, सर्वत्र उडाला गोंधळ!
एलन मस्कच्या मालकीची कंपनी xAI च्या AI चॅटबोट Grok ची सर्वत्र चर्चा सुरु आहे. याचं कारण म्हणजेच सर्च इंजिन गुगलवर Grok चे लाखो वैयक्तिक चॅट्स लिक झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 3.7 लाखंहून अधिक चॅट्स सर्च इंजिनवर इंडेक्स झाले आहेत. या चॅट्समध्ये लोकांचे मेडिकल आणि मानसिक आरोग्याशी संबंधित प्रश्न आहे, व्यवयासासंबंधित माहिती आणि एक पासवर्ड देखील आहे. चॅट्स लिक झाल्याने युजर्समध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.
Grok च्या एक शेयर फीचरने ही सर्व समस्या निर्माण केली आहे. खरंतर या शेअर फीचरमुळे युजर्स त्यांचे चॅट्स इतर कोणालाही लिंकद्वारे पाठवू शकतात. मात्र आता याच शेअर फीचरमुळे युजर्सवर मोठं संकट आलं आहे. जेव्हा युजर्स शेअर फीचरचा वापर करून त्यांचे चॅट्स इतर युजर्सना पाठवत होते, तेव्हा हे चॅट्स Grok च्या वेबसाईटवर पब्लिश झाल्याचं पाहायला मिळाले, ज्यामुळे ते सर्च इंजिनवर देखील दिसू लागले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे युजर्सना माहितीचं नव्हतं की त्यांचे चॅट्स गुगलवर पब्लिश होत आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
लिक झालेले बहुतेक चॅट्समध्ये मेडिकल आणि मानसिक आरोग्याशी संबंधित प्रश्न, व्यवयासासंबंधित माहिती आणि एक पासवर्ड होता. मात्र काही चॅट्समध्ये असे प्रश्न होते, जे वाचून तुमचंही डोकं फिरू शकतं. युजर्सनी विचारलं होतं की, Grok च्या टर्म्स ऑफ सर्विसचे उल्लंघन कसे करावे. उदाहरणार्थ एका चॅटमध्ये युजरने विचारलं होतं की, Class A ड्रग कशा प्रकारे तयार करू शकतो, तर एका युजरने विचारलं होतं की, एलन मस्कची हत्या कशी करू शकतो. कंपनीच्या धोरणांमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की प्लॅटफॉर्मचा वापर कोणाच्याही जीवाला धोका निर्माण करण्यासाठी केला जाऊ शकत नाही.
चॅट्स लीक होण्याची ही पहिलीच घटना नाही. अनेकदा अशा घटना घडल्या आहेत, ज्यामध्ये खाजगी मानले जाणारे एआय चॅट्स ऑनलाइन सार्वजनिक झाले आहेत. OpenAI ने यापूर्वी देखील त्यांच्या एआय चॅटबोट ChatGPT मध्ये चॅट शेअर फीचर दिलं होतं. ऑप्ट-इन असल्यानंतर देखील गुगलवर 4,500 हून अधिक वैयक्तिक चॅट्स लीक झाले आहेत. त्यामुळे वाद वाढत गेला आणि अखेर कंपनीला हे फीचर हटवण्याचा निर्णय घ्यावा लागला. सर्वात मजेदार गोष्ट म्हणजे त्यावेळी मस्कने या मुद्द्याचा वापर करून Grok प्रमोट केले होते आणि X वर लिहीले होतं की, “Grok FTW.” मात्र Grok च्या शेयर फीचरमध्ये ChatGPT सारखी चेतावणी देण्यात आली नव्हती, ज्यामध्ये सांगितलं जाईल की युजर्सचे हे वैयक्तिक चॅट्स लीक होऊ शकतात.
Meta च्या AI अॅप आणि गुगलच्या बार्डमधील शेअरिंग फीचरमुळे, यूजर्सचे प्रायव्हेट संभाषण सर्च रिजल्ट्समध्ये दिसू लागले. जरी गुगलने 2023 मध्ये ही समस्या सोडवली असली तरी, मेटाने अजूनही त्यांच्या चॅट्सना सर्च इंजिनमध्ये इंडेक्स करण्याची परवानगी दिली आहे.