iOS 19 अपडेट युजर्ससाठी घेऊन येणार सरप्राईज, बदलणार iPhone चा लूक! काय असणार खास, जाणून घ्या
टेक जायंट कंपनी अॅपलने नुकतेच त्यांच्या WWDC 2025 ईव्हेंटच्या तारखा जाहीर केल्या आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही कंपनी त्यांचा वार्षिक ईव्हेंट आयोजित करणार आहे. कंपनीने WWDC ईव्हेंटच्या तारीख जाहीर केल्यानंतर अशी अपडेट समोर आली होती, की या ईव्हेंटवेळी कंपनी त्यांच्या युजर्ससाठी iOS 19 सादर करणार आहे. यानंतर iOS 19 बाबत अनेक लिक्स येऊ लागले. या लिक्समध्ये iOS 19 सह युजर्सना कोणते नवीन फीचर्स मिळणार आणि युजर्सचा अनुभव कशा प्रकारे बदलणार याबाबत माहिती समोर आली आहे.
दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या ईव्हेंटमध्ये कंपनी त्यांच्या आगामी iOS अपडेटबद्दल घोषणा करते आणि त्यांच्या नवीन iOS ची पहिली झलक सादर करते. त्यामुळे यंदाही युजर्सना अपेक्षा आहे की, या ईव्हेंटमध्ये नवीन अपडेट सादर केलं जाणार आहे. असं सांगितलं जात आहे की, हे अपडेट आतापर्यंतचे सर्वात मोठे सॉफ्टवेअर अपडेट असू शकते कारण यामध्ये कंपनी iOS 7 नंतरचे सर्वात मोठे रीडिझाइन करू शकते, जे व्हिजन ओएससारखे असू शकते. या आगामी अपडेटनंतर आयफोनचा लूक पूर्णपणे बदलणार आहे. अॅपलचे सीईओ टिम कुक आणि प्रसिद्ध अॅपल विश्लेषक मार्क गुरमन यांनीही याबद्दल माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
मार्क गुरमन यांच्या मते, या सॉफ्टवेअर अपडेटमध्ये आयकॉन, मेनू, अॅप्स, विंडोज आणि सिस्टम बटणांची रचना पूर्णपणे बदलू शकते, ज्यामुळे ते व्हिजन ओएससारखे दिसेल. कंपनीने Apple च्या Vision Pro हेडसेटसाठी Vision OS तयार केले होते, जे Mixed Reality ला सपोर्ट करते. आता हे पारदर्शक डिझाइन iOS 19 मध्ये देखील दिलं जाण्याची शक्यता आहे. हे पारदर्शक UI युजर्सना त्यांच्या वॉलपेपर ईमेजशी सहजपणे संवाद साधण्यास मदत करेल आणि वेगवेगळ्या अॅप्सचे ओव्हरले छान प्रदर्शित करेल.
तथापि, iOS 18 च्या काही भागांमध्ये अजूनही पारदर्शक डिझाइन दिसून येते, ज्यामधील कंट्रोल सेंटर, डॉक आणि नोटिफिकेशन्समध्ये आधीपासूनच पारदर्शक डिझाइन उपस्थित आहे, परंतु iOS 19 मध्ये ही पारदर्शक डिझाइन आणखी चांगली असेल. यासोबतच, आयकॉनची रचना देखील बदलू शकते आणि आयकॉन 3D लूकसह दिसतील. iOS 19 लीक्समध्ये असे दिसून आले आहे की या नवीन 3D लूकसह विजेट्स देखील पुन्हा डिझाइन केले गेले आहेत जे खूपच छान दिसते.
एवढेच नाही तर, अॅपल त्यांच्या iOS 19 अपडेटमध्ये कॅमेरा इंटरफेस पूर्णपणे बदलू शकते. जॉन प्रोसरच्या लीक झालेल्या प्रतिमांवरून असे दिसून आले आहे की नवीन कॅमेरा UI मध्ये व्हिडिओ मोडचा पूर्ण-स्क्रीन पूर्वावलोकन असेल, ज्यामुळे युजर्स अधिक चांगल्या प्रकारे व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतील. याशिवाय, मेसेजिंग अॅपमध्ये गोल कीबोर्ड आणि पारदर्शक पार्श्वभूमीसारखे बदल देखील दिसून येतात, ज्यामुळे चॅटिंगचा अनुभव आणखी चांगला होऊ शकतो. त्याच वेळी, हे नवीन iOS 19 या वर्षी 9 जून रोजी होणाऱ्या Apple च्या WWDC 2025 कार्यक्रमात उघड केले जाऊ शकते.