
Cyberbullying: Cyberbullying नेमकं आहे तरी काय? ऑनलाईन स्कॅम की दुसरं काही? अशा प्रकारे राहा सुरक्षित
सोशल मीडिया जेवढा चांगला आहे, तेवढचा घातक देखील आहे. सध्या सोशल मीडिया युजर्सना टार्गेट केलं जात आहे आणि त्यांना सायबर बुलिंग केलं जात आहे. सायबर बुलिंग हा डिजिटल माध्यमातून एखाद्या व्यक्तीला धमकावण्याचा, घाबरवण्याचा, अपमानित करण्याचा किंवा त्रास देण्याचा एक मार्ग आहे. गुन्हेगार सोशल मीडिया युजर्सना सोशल मीडिया, चॅट, ॲप्स, ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्म, ईमेल किंवा इतर इंटरनेट माध्यमांद्वारे धमकी देऊ शकतात किंवा घाबरवू शकतात. या सर्व घटनेला सायबर बुलिंग असं नाव देण्यात आलं आहे.
आता क्रेडीट कार्डने करा UPI पेमेंट, ही आहे लिंक करण्याची सोपी प्रोसेस! जाणून घ्या सविस्तर
सायबर बुलिंग वाचायला जरी सोप असलं तरी त्याचा परिणाम माणसांच्या मानसिकतेवर होऊ शकतो. सायबर बुलिंगचा उद्देश एखाद्या व्यक्तीवर मानसिक तणाव निर्माण करणे, त्यांची ईमेज खराब करणे किंवा त्यांना एकटेपणाची भावना निर्माण करणे असू शकते. त्यामुळे सायबर बुलिंगपासून स्वत:चं संरक्षण करणं फार महत्त्वाचं आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
सायबर बुलींग म्हणजे इंटरनेट, सोशल मीडिया किंवा इतर डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे एखाद्या व्यक्तीला धमकावणे, घाबरवणे, अपमानित करणे किंवा त्रास देणे. या सर्व गोष्टींमुळे समोरील व्यक्तिचा आत्मसम्मान डाऊन होतो आणि त्या व्यक्तीवर मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. सायबर बुलींगदरम्यान गुन्हेगार एखाद्या व्यक्तिविषयी अपमानास्पद संदेश पाठवतात, खोट्या अफवा पसरवतात, एखाद्याची वैयक्तिक माहिती सार्वजनिक करतात आणि अश्लील किंवा धमकावणारे मॅसेज पाठवतात .
ऑनलाइन छळ: धमकीचे संदेश पाठवणे किंवा सतत अपमानास्पद मॅसेज पाठवणे.
डॉक्सिंग: एखाद्याची वैयक्तिक माहिती जसे की फोन नंबर, पत्ता किंवा फोटो ऑनलाइन लीक करणे.
बनावट प्रोफाइल तयार करणे: एखाद्या व्यक्तीची खोटी ईमेज तयार करण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या नावाने बनावट प्रोफाइल तयार करणे.
खोट्या पोस्ट किंवा अफवा पसरवणे: सोशल मीडियावर एखाद्याची ईमेज खराब करण्यासाठी खोट्या पोस्ट किंवा अफवा पसरवणे.
ऑनलाइन बहिष्कार: जाणूनबुजून एखाद्या व्यक्तिली ग्रुप किंवा ऑनलाइन अॅक्टिव्हिटीजमधून वगळणे.
सायबर बुलिंग सारख्या घटनांमध्ये समोरच्या व्यक्तीच्या भावना दुखावल्या जातात. त्याच्या आत्मसमान्नाला ठेच लागते. अशावेळी माणसाच्या मनावर प्रचंड तणाव निर्माण होतो. समोरच्या व्यक्तिवर मानसिक तणाव निर्माण करण्याच्या उद्देशाने सायबर बुलिंगचा हल्ला केला जातो. मात्र ऑनलाईन स्कॅमच्या घटनांमध्ये असं नसतं. फिशिंग, खोट्या ऑफर किंवा हॅकिंग यांसारख्या ऑनलाईन स्कॅममध्ये फसवणुकीद्वारे आर्थिक फायदा मिळवला जातो. मात्र सायबर बुलिंगमध्ये आर्थिक फायद्याचा विचार केला जात नाही.
सायबर बुलिंगमुळे, पीडित व्यक्तीला मानसिक तणाव, कमी आत्मसन्मान आणि कधीकधी तीव्र नैराश्याचा त्रास होऊ शकतो. त्याचा वैयक्तिक, सामाजिक आणि शैक्षणिक जीवनावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. अशावेळी पिडीत व्यक्ती नैराश्येत जाऊ शकते.
पुरावे गोळा करा: अपमानास्पद संदेश, पोस्ट किंवा ईमेलचे स्क्रीनशॉट घ्या. सायबर बुलिंगची तक्रार केल्यास हे पुरावे तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.
ब्लॉक करा आणि तक्रार करा: संबंधित व्यक्तीला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ब्लॉक करा आणि त्यांच्या कृतीची तक्रार प्लॅटफॉर्मवर करा.
मित्र आणि कुटुंबाशी बोला: तुमच्या जवळच्या व्यक्तीला याबद्दल सांगा, ज्यामुळे तुमची मदत होऊ शकते.
कायदेशीर मदत घ्या: गंभीर प्रकरणांमध्ये, सायबर क्राईम सेलशी संपर्क साधा.
सायबर क्राइम पोर्टल: www.cybercrime.gov.in वर तक्रार दाखल करा .
1930 हेल्पलाइन: नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग हेल्पलाइन.