फोटो सौजन्य - istock
सध्या देशात ऑनलाईन फ्रॉडच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सायबर स्कॅमर नागरिकांना WhatsApp वर खोटे मॅसेज पाठवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मॅसेज जरी खोटा असला तरी त्यामधील मजकूर पाहून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होते आणि अशा परिस्थितीत घाबरलेले नागरिक ऑनलाईन स्कॅमला बळी पडतात. अशा घटनांमध्ये नागरिकांचे बँक अकाऊंट खाली होतं तर काही वेळा त्यांच्या फोनमधून डेटा चोरला जातो.
हेदेखील वाचा- तुमच्या स्लो Wi-Fi नेटवर्कमुळे हैराण झाला आहात? ‘या’ सोप्या स्टेप्स फॉलो करा
हल्लीच आपल्या देशात WhatsApp वर खोटे मॅसेज पाठवून नागरिकांची फसवणूक करण्याच्या 4 ते 5 घटना समोर आल्या आहेत. महिन्याभरापूर्वी देशभरातील नागरिकांच्या WhatsApp वर एक मॅसेज आला होता. हा मॅसेज विद्युत विभागाकडून पाठवण्यात आला असल्याचा दावा सायबर स्कॅमर्सनी केला होता. आज रात्री 9.30 वाजता तुमच्या घराचा वीज पुरवठा खंडित होणार आहे, असं मॅसेजमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा एक मॅसेज व्हायरल झाला. ज्यामध्ये म्हटलं होतं की, तुम्ही गॅसचं बिल भरलं नसल्याने तुमचं गॅस कनेक्शन कापलं जाणार आहे. यानंतर काही दिवसांपूर्वीच अनेकांना त्यांच्या WhatsApp वर वाहतूक दंडाचा मॅसेज आला होता. या मॅसेजमध्ये युजर्सना बनावट वाहतूक दंड लागू करण्यात आला होता आणि युजर्सना दंड भरण्यासाठी ॲप डाउनलोड करण्यास सांगितलं जातं होतं. हा ॲप डाऊनलोड केल्यास युजर्सची सर्व माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचत होती.
हेदेखील वाचा- ‘या’ टॅबवरून निर्मला सीतारामन यांनी सादर केलं बजेट; जाणून घ्या काय आहे किंमत
अनेकदा अशा खोट्या मेसेजमध्ये लिंकही दिली जाते. तुम्हाला या लिंकवर क्लिक करण्यास सांगितलं जातं. तुम्ही अशा लिंकवर क्लिक केल्यास, सायबर गुन्हेगारांनी पाठवलेला मालवेअर तुमच्या फोनवर इन्स्टॉल होईल किंवा ती लिंक तुम्हाला बनावट वेबसाइटवर घेऊन जाईल, जिथून तुम्हाला थेट तुमची वैयक्तिक माहिती विचारली जाईल किंवा मग तुमची सर्व वैयक्तिक माहिती, तुमच्या फोनमधील संपर्क क्रमांक, संदेश, बँक तपशील, पासवर्ड इत्यादींचा डेटा चोरीला जाईल. ही वैयक्तिक माहिती चोरून, सायबर स्कॅमर वेगवेगळ्या मार्गाने तुमची फसवणूक करू शकतात आणि तुमचं लाखो रुपयांचं नुकसान होऊ शकतात. त्यामुळे अशा कोणत्याही संदेशावर विश्वास ठेवण्याआधी सावधगिरी बाळगा आणि जर तुम्हाला असा कोणताही संदेश आला तर सर्वप्रथम संबंधित कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर संपर्क साधा.