हे आहेत जगातील सर्वात जुने बाजार! माशांपासून कपड्यांपर्यंत येथे सर्व काही मिळणार
आपल्या सर्वांना खरेदी करायला आवडते. खाण्याचं सामान, कपडे, घरातील वस्तू या सर्व गोष्टींची खरेदी करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं. पण या सर्व गोष्टी जर आपल्याला एकाच ठिकाणी खरेदी करता आल्या तर किती बर होईल ना? आता आम्ही तुम्हाला अशा काही बाजारांबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही मासे, मसाल्यांपासून अगदी घरातल्या सामानापर्यंत सर्व वस्तूंची खरेदी करू शकता. एक खास गोष्ट म्हणजे हे जगातील सर्वात जुने बाजार आहेत.
या बाजारांना जगप्रसिद्ध बाजारपेठा देखील म्हटलं जातं. यापैकी अनेक मार्केट आहेत जिथे तुम्हाला प्रत्येकी लाखोंच्या संख्येने गर्दी दिसेल.जगातील सर्वात जुन्या बाजारपेठांच्या या यादीत भारताच्या प्रसिद्ध बाजाराचे नाव देखील समाविष्ट आहे. चला तर या बाजारपेठांबद्दल जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – pinterest)
1455 मध्ये स्थापित, ग्रँड बाजार जगातील सर्वात मोठ्या आणि जुन्या बाजारांपैकी एक आहे. हे मार्केट 30,000 स्क्वेअर मीटरमध्ये पसरले आहे आणि येथे 4,000 पेक्षा जास्त दुकाने आहेत. ऐतिहासिकदृष्ट्या, ग्रँड बाजार हा रेशीम मार्गावरील व्यापाराचे एक महत्त्वाचे केंद्र होते, जे युरोप, आशिया आणि आफ्रिकेतील व्यापारी आणत होते. आज ही बाजारपेठ सुंदर दागिने, कापड, तुर्की कार्पेट्स, मसाले आणि सिरॅमिकसाठी प्रसिद्ध आहे.
चांदणी चौक 1650 मध्ये बांधण्यात आला होता. शहाजहानची मुलगी जहांआरा हिने शाहजहानाबादच्या लाल किल्ल्याच्या पश्चिमेला याची स्थापना केली. चांदणी चौक आज भारताची सर्वात मोठी बाजारपेठ बनली आहे. जर कोणी भारतात लग्न करणार असेल तर बहुतेक कुटुंबे येथूनच खरेदी करणे पसंत करतात. येथे प्रत्येक आवश्यक वस्तू उपलब्ध आहे, ज्यामुळे वर्षभर गर्दी असते. आज ही बाजारपेठ सुक्या मेव्यापासून ते कपडे, दागिने, मसाले, स्ट्रीट फूड आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपर्यंत सर्वांसाठी प्रसिद्ध आहे. रविवारी हा बाजार बंद असतो.
खान अल खलीली ही इजिप्तमधील सर्वात जुनी बाजारपेठ आहे. या बाजाराची स्थापना 1382 मध्ये झाली. येथील बहुतांश दुकाने आणि स्टॉल सकाळी 9 वाजेपासून सूर्यास्तानंतर उघडे असतात. मात्र, रविवारीही अनेक दुकानदार दुकाने उघडी ठेवतात. या मार्केटमध्ये तुम्ही इजिप्शियन प्राचीन वस्तू, मसाले आणि सुंदर कार्पेट्स खरेदी करू शकता.
बरो मार्केट हे लंडनमधील सर्वात जुने आणि प्रसिद्ध खाद्य बाजारांपैकी एक आहे. लंडन ब्रिजजवळ साउथवार्कमध्ये स्थित, हे घाऊक बाजार आहे जेथे मोठ्या संख्येने लोक खरेदी करतात. जर तुम्ही लंडनला येण्याचा विचार करत असाल तर या मार्केटला भेट द्यायला विसरू नका. येथे तुम्हाला अनेक उत्कृष्ट खाद्य पर्याय मिळतील. हा बाजार खाद्यप्रेमींसाठी स्वर्ग आहे. हा बाजार 1851 मध्ये बांधण्यात आला होता. बाजार सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू असतो.
places for senior citizens: रिटायरमेंटनंतर भारतातील या ठिकाणांना नक्की भेट द्या, आनंद होईल द्विगुणित
1907 मध्ये स्थापन झालेली पाईक प्लेस मार्केट ही युनायटेड स्टेट्समधील शेतकऱ्यांची सर्वात जुनी बाजारपेठ आहे. स्थानिक शेतकऱ्यांना थेट ग्राहकांशी जोडण्यासाठी ही बाजारपेठ तयार करण्यात आली. हे मार्केट त्याच्या “फ्लाइंग फिश” साठी प्रसिद्ध आहे, जेथे विक्रेते ग्राहकांचे मनोरंजन करण्यासाठी मासे उडवतात असं म्हटलं जातं. तुम्हाला ताजी फळे, सुंदर फुले, कृत्रिम हस्तकला खरेदी करण्यासाठी स्टॉल देखील येथे आहेत.