डोंबिवली : कधी हिरवा पाऊस, कधी काळ्या रंगाचे ठिपके आणि आता गुलाबी रंगाचं पाणी, डोंबिवली MIDC परिसरात नेहमीच काही ना काही रहस्यमय घटना घडल्या. आज दिवसभरात मुंबई आणि उपनगराला देखील पावसाचा जोरदार फटका बसला आहे. याचदरम्यान डोंबिवलीतील नाल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डोंबिवलीतील एका नाल्यात गुलाबी रंगाचं पाणी कंपनीने सोडल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच व्हिडीओची दखल घेत शिवसेना शिंदे गटाच्या राजेश कदम यांनी सगळ्याचा पाठपुरावा केला आहे.
शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांच्या म्हणण्यानुसार, गुलाबी रंगाचं पाणी कंपनीने नाल्यात सोडले नाही. गेले दोन दिवस ठाणे जिल्ह्यात पाऊस पडत आहे. त्यामुळे एमआयडीसी परिसरात पाणी साचलं. एमआयडीसी परिसरात एक कंपनी सखल भागात आहे. या कंपनीच्या आवारातही पावसाचे पाणी शिरलं होतं. त्यामुळे कंपनीतील रंग त्या पाण्यात मिसळला. तेच रंग मिसळलेले गुलाबी पाणी नाल्याला जाऊन मिळाले.
या कंपनीत प्रिंटिंग आणि लेदर प्रिंटिंगसाठी वापरले जाणारे रंग तयार होतात असे कंपनी अधिकाऱ्याने सांगितले. यावेळी एमआयडीसी अधिकारी देखील उपस्थित होते. याबाबत अधिकाऱ्यांनी देखील चौकशी केली. चौकशी दरम्यान असा निष्कर्ष निघाला की, पावसाचा फायदा घेत कंपनीने नाल्यात गुलाबी रंग सोडलेला नाही, असं शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख कदम यांनी सांगितले आहे.
2014 साली देखील असाच काही प्रकार झाला होता. परिसरात हिरवा पाऊस पडल्याची घटना घडली त्यामुळे एकच खळबळ माजली होती. तेव्हा देखील त्या कंपनीचा शोध शिंदे गटाने घेतला होता. त्या घटनेच्या वेळी एक हिरवा फूड रंग होता आणि त्याची पावडर वाहतुकी दरम्यान रस्त्यावर पडली होती. नंतर पाऊस आल्यावर पाण्यामुळे सर्वत्र रस्ते हिरवे झाले होते. दरम्यान या सगळ्यावर कंपनीच्या विरोधात प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई केली होती.
नाल्यात गुलाबी पाणी सोडलं नसून ते साचलेलं पाणी नाल्याला जाऊन मिळालं. मात्र यासगळ्या घटनेचं गांभीर्य मोठं असल्याने त्या कंपनीवर रितसर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. एमआयडीसीच्या प्रशासनाला विनंती आहे. गुलाबी पाणी नाल्यात सोडणाऱ्यांच्या विरेाधात विरोधात कडक कारवाई करावी. अन्यथा शिवसेना ठाकरे गटाकडून एमआयडीसी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी दिला आहे.