वडगाव नगरपंचायत प्रभाग रचना जाहीर झाला असून हरकती नोंदविण्याचे मुख्याधिकाऱ्यांच्या आवाहन केले (फोटो - टीम नवराष्ट्र)
वडगाव मावळ : महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या आदेशान्वये नगरपरिषद / नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ करता वडगाव नगरपंचायतीच्या प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच प्रभाग संख्या निश्चित करून आराखडा विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला आहे. येत्या २१ ऑगस्टपर्यंत हरकती-सूचना नोंदविता येतील अशी माहिती वडगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तथा प्रशासक प्रवीण निकम यांनी दिली आहे.
वडगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. निकम यांनी शासनाच्या आदेशानुसार प्रारूप प्रभागरचना तयार करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवडणूक आयोगाकडे मंजुरीसाठी पाठवला होता. निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यानंतर आज प्रारूप प्रभाग रचनेची प्रसिद्धी करण्यात आली असून, हरकती व सूचना असल्यास दाखल कराव्यात,असे आवाहन करण्यात आले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
प्रभाग रचनेच्या वेळापत्रकानुसार दि १८ ते २१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर प्रभाग रचना नोटीस व नकाशा कार्यालयीन वेळेत नगरपंचायतच्या नोटीस बोर्डवर उपलब्ध असेल, तसेच नगरपंचायतच्या वेबसाईटवर उपलब्ध असेल. त्यावर नागरिकांनी आपल्या हरकती व सूचना नोंदवाव्यात. इच्छुक नागरिकांनी आपली हरकती / सूचना नगरपंचायत कार्यालयातील आवक-जावक विभागामध्ये लेखी स्वरूपात सादर कराव्यात. हरकती व सूचना सादर केलेल्या नागरिकांना स्वतंत्रपणे सुनावणीसाठी कळविण्यात येईल. मुदतीनंतर आलेल्या हरकतींचा व सूचनांचा विचार केला जाणार नाही अशी माहिती वडगाव नगरपंचायत प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
वडगाव नगरपंचायत हद्दीत पूर्वीप्रमाणेच १७ प्रभाग असून, रचनेमध्येही फारसा बदल झालेला दिसत नाही. तसेच प्रभागांची व सदस्यांची संख्याही १७असल्याचे यामुळे निश्चित झाले आहे. हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत दाखल झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी होणार असून, त्यानंतर पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवडणूक आयोगाची परवानगी मिळाल्यावर अंतिम प्रभाग रचना २६ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पवना धरणातून ५,७२० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू
मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात मुसळधार पावसामुळे नद्या काठच्या गावांना पूरस्थिती निर्माण झाली आहे.हवामान विभागाने देखील पुणे जिल्हा घाट माथा क्षेत्रात पुढील ४८ तास अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे पवना धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. धरण ९९.७० टक्के एवढे भरले आहे. दरम्यान आज (दि.१९) सकाळी ९ वाजता धरणातून क्युसेक्सने ५७२० पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात असून सदर विसर्ग १०००० क्युसेक्सने वाढण्याची शक्यता आहे अशी असल्याची माहिती पवना धरण पूर नियंत्रण कक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.