सीरियात चर्चेमध्ये भीषण आत्मघाती हल्ला; १५ ठार, १३ गंभीर जखमी
सीरियाच्या राजधानी दमास्कमध्ये रविवारी सकाळी एक भीषण आत्मघाती हल्ला झाला. शहराच्या डवैला परिसरात असलेल्या ‘सेंट एलियास चर्च’मध्ये प्रार्थना सभेवेळी झालेल्या या हल्ल्यात किमान १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १३ हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. हा हल्ला सीरियाच्या इतिहासातील अत्यंत धक्कादायक आणि क्रूर घटनांपैकी एक मानला जात आहे.
सकाळच्या सुमारास अनेक नागरिक चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जमले असताना, एक आत्मघाती हल्लेखोर चर्चमध्ये शिरला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, हल्लेखोराने चर्चमध्ये घुसल्यानंतर काही क्षणांतच गर्दीवर अंधाधुंध गोळीबार सुरू केला. त्यानंतर त्याने अंगावर असलेली स्फोटक जॅकेट उडवून दिली. या स्फोटाचा आवाज संपूर्ण परिसरात घुमला आणि काही क्षणांतच परिसरात मृतदेह, जखमी आणि धूराचे लोट पाहायला मिळाले.
स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यापैकी काहींची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. सीरियाच्या गृह मंत्रालयाने या हल्ल्याची पुष्टी करत सांगितलं की, हल्लेखोर दहशतवादी संघटना ISIS शी संबंधित होता. त्याने नियोजनपूर्वक चर्चमध्ये प्रवेश केला, आणि अतिशय क्रूरतेने हा हल्ला घडवून आणला. या घटनेची जबाबदारी अद्याप अधिकृतपणे कोणत्याही गटाने घेतली नव्हती, परंतु मंत्रालयाच्या तपासानुसार हल्ला ISISशी संबंधित असल्याचे प्राथमिक निष्कर्ष आहेत.
या घटनेनंतर सीरियाचे माहिती मंत्री डॉ. हमज़ा अल-मुस्तफा यांनी पत्रकार परिषद घेत या भ्याड कृत्याचा तीव्र निषेध केला. त्यांनी म्हटले की, “ही एक क्रूर घटना असून ती सीरियाच्या एकतेवर घाला घालण्याचा प्रयत्न आहे. सरकार मृतांच्या कुटुंबीयांसोबत खंबीरपणे उभं आहे आणि या हल्ल्याचा संपूर्ण तपास करून जबाबदारांवर कठोर कारवाई केली जाईल”
दमास्कच्या ड्वैला परिसराला राजधानीतील सर्वाधिक सुरक्षित भागांपैकी एक मानलं जातं, त्यामुळे इतक्या कठोर सुरक्षा व्यवस्थांमध्ये असा हल्ला होणं ही गंभीर बाब आहे. या घटनेमुळे राजधानीतील सुरक्षा यंत्रणांवर आणि प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या भीषण हल्ल्यामुळे सीरियामध्ये शोक आणि संतापाचं वातावरण आहे. सर्वच धार्मिक समुदायांनी या घटनेचा निषेध केला असून, नागरिकांनी एकतेने आणि शांततेने राहण्याचे आवाहन केले आहे.