अमेरिकेच्या ६ बी-२ स्टेल्थ बॉम्बर्सचं इराणच्या दिशेने उड्डाण? फोर्डो न्यूक्लियर साइटवर हल्ला होण्याची शक्यता
अमेरिकेच्या अत्याधुनिक आणि अत्यंत गोपनीय बी-2 स्टेल्थ बॉम्बर्सनी मिसोरी येथून उड्डाण भरलं आहे. बी-2 स्टेल्थ बॉम्बर्सनी थेट गुआममधील अमेरिकी लष्करी तळाकडे कूच केलं आहे. त्यामुळे अमेरिका इराणच्या मजबूत आणि अंडरग्राउंड फोर्डो न्यूक्लियर साइटवर हल्ला करण्याच्या तयारीत करत असल्याची चर्चा आहे. खोलवर असलेल्या अणु स्थळांना उद्ध्वस्त करण्याची ताकद असलेल्या बॉम्बर्समध्ये ‘बंकर बस्टर’ बॉम्ब असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
Israel Iran War : काय आहे इस्रायलची ‘Shaldag’ कंमाडर योजना? इराणच्या अणु ठिकाणांना करणार उद्ध्वस्त?
बी-2 स्टेल्थ बॉम्बर्सनी मिसुरी येथून उड्डाण केल्यानंतर त्यांनी प्रशांत महासागरावर आकाशातच इंधन भरले. याचा अर्थ असा की, या विमानांनी जड पेलोड – म्हणजेच मोठ्या प्रमाणात बॉम्बसह – उड्डाण घेतले आहे. अशा परिस्थितीत हे ‘बंकर बस्टर’ बॉम्ब असल्याची शक्यता अधिकच बळावली आहे.
प्रत्येक बी-2 बॉम्बर १५ टन वजनाचे दोन बंकर बस्टर बॉम्ब सहजपणे वाहून नेऊ शकतो. हे बॉम्ब अत्यंत जाड आणि मजबूत बंकरसुद्धा फोडण्यास सक्षम आहेत. सध्या हे बॉम्ब केवळ अमेरिकेकडेच आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ईरानमधील फोर्डो अणुस्थळ हे इतके मजबूत आणि खोलवर आहे की त्यावर केवळ बंकर बस्टर बॉम्बच परिणाम करू शकतात.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच जाहीर केले होते की ईरानच्या अणु कार्यक्रमावर कारवाईचा निर्णय दोन आठवड्यांत घेतला जाईल. त्यांनी स्पष्ट केले की, जर ईरानने चर्चेसाठी पुढे येण्यास नकार दिला, तर अमेरिका हल्ला करण्यास मागे-पुढे पाहणार नाही.
दरम्यान, इस्रायलनेही स्पष्ट केले आहे की, फोर्डोवर हल्ला करायचा असेल, तर अमेरिका आली तरी ठीक आणि न आली तरी इस्रायल एकटाच कारवाई करेल. इस्रायललाही सध्या ‘बंकर बस्टर’ बॉम्बची गरज आहे, परंतु हे बॉम्ब फक्त अमेरिकेकडेच असल्यामुळे अमेरिकेच्या भूमिकेकडे जगाचे लक्ष लागून आहे. या सगळ्या हालचाली पाहता, अमेरिका आणि इस्रायल ईरानच्या अणु कार्यक्रमाविरोधात निर्णायक पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत, अशी जोरदार शक्यता आहे. ६ बी-२ स्टेल्थ बॉम्बर्सचा गुप्तपणे झालेला प्रवास हे निश्चितच एका मोठ्या कारवाईचे संकेत देत आहे.