इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक हिंदूंवरील हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आता कराचीतील हिंदूंचे 150 वर्षे जुने मंदिर रात्रीच्या अंधारात पूर्णपणे पाडण्यात आले. मोठी गोष्ट म्हणजे या वेळी मंदिर तोडणाऱ्यांना पोलिसांनी सुरक्षा पुरवली. सकाळी मंदिराचे पुजारी आले तेव्हा हे मंदिर उद्ध्वस्त झाल्याचे दिसले. त्याचे नाव मरी माता मंदिर होते. हे मंदिर कराचीच्या गजबजलेल्या सोल्जर बाजार परिसरात होते.
नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, शुक्रवारी रात्री उशिरा या भागात वीज नसताना ही तोडफोड करण्यात आली. यावेळी बाहेरील भिंती आणि मुख्य गेट वगळता मंदिराच्या आतील संपूर्ण संरचना तोडण्यात आली. स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, बुलडोझर आणि इतर उपकरणे चालविणाऱ्या व्यक्तींना संरक्षण देण्यासाठी पोलिस वाहन देखील घटनास्थळी उपस्थित होते.
कराचीतील मारी माता मंदिर मुखी चोहितराम रोडवर सोल्जर बाजार पोलिस स्टेशनच्या अगदी जवळ आहे. श्री पंचमुखी हनुमान मंदिराजवळील आणखी एका जुन्या मंदिराचे श्री राम नाथ मिश्र महाराज यांनी सांगितले की, ते खूप जुने मंदिर आहे. साधारण दीडशे वर्षांपूर्वीच असल्याचं सांगितले जाते, असेही ते म्हणाले. हे मंदिर सुमारे 400 ते 500 स्क्वेअर यार्डमध्ये पसरले आहे.
राम नाथ मिश्रा महाराज यांनी सांगितले की, मारी माता मंदिर कराचीचे व्यवस्थापन मद्रासी हिंदू समुदायाने केले आहे. ही अतिशय जुनी आणि धोकादायक रचना असून ती कधीही कोसळू शकते, असे सांगण्यात येत होते. मंदिर व्यवस्थापनाने अनिच्छेने पण तात्पुरत्या स्वरुपात त्यांच्या बहुतेक देवतांना मोठ्या दबावानंतर इतर मंदिरात हलवले. या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम होईपर्यंत एक खोलीही घेतली होती, ज्यामध्ये आवश्यक वस्तू ठेवल्या होत्या, असेही ते म्हणाले. मात्र काल रात्री मरी माता मंदिर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले.
दरम्यान, मद्रासी हिंदू गटाच्या एका सदस्याने दावा केला की, त्याला दोन व्यक्तींनी जबरदस्तीने मंदिर सोडण्यास भाग पाडले. मारन हाश्मी आणि रेखा उर्फ नागिन बाई अशी या दोघांची नावे आहेत. सदस्याने असेही सांगितले की त्याने ऐकले आहे की हे दोघे लोक मंदिराची जागा कुणालातरी विकणार आहेत. खरेदीदाराला मंदिराच्या जागेवर व्यापारी संकुल बांधायचे होते.