A 128-year-old wound is finally healing France returns the skull of the king of Madagascar
King Toera skull return : १२८ वर्षांपूर्वीचे ते काळेकुट्ट दिवस… वसाहतवादी शक्तींनी जगभरात केलेल्या अत्याचारांच्या कहाण्या आजही इतिहासाच्या पानांतून रक्ताळल्या दिसतात. त्या काळात आफ्रिकेतील मादागास्कर देशालाही फ्रेंच सैन्याच्या क्रौर्याचा सामना करावा लागला. हजारो निरपराध लोकांचा बळी गेला, त्यात राजघराण्याची प्रतिष्ठाही धुळीस मिळाली. इतकेच नव्हे तर पराभूत योद्ध्यांचे आणि नेत्यांचे शीर कापून ते “ट्रॉफी”प्रमाणे संग्रहालयांत सजवले गेले. अशाच प्रकारे मादागास्करचा राजा टोएरा याची कवटी फ्रान्समध्ये नेली गेली. आज, तब्बल १२८ वर्षांनंतर, ही कवटी अखेर आपल्या मातीत परतली आहे. पॅरिसमधील फ्रेंच संस्कृती मंत्रालयात झालेल्या एका भावनिक समारंभात, फ्रान्सने मादागास्करला तीन मानवी कवट्या परत सुपूर्द केल्या. या कवट्यांपैकी एक राजा टोएरा यांची असण्याची शक्यता आहे.
समारंभादरम्यान पारंपरिक पोशाखात झाकलेल्या विशेष पेट्यांमध्ये या कवट्या आणल्या गेल्या. सभागृहात उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. फ्रेंच संस्कृती मंत्री रचिदा दाती यांनी याला “इतिहासाशी सामना करण्याचे आणि न्याय देण्याचे पाऊल” असे संबोधले. त्या म्हणाल्या “या कवट्या जेव्हा संग्रहालयांचा भाग बनल्या, तेव्हा त्यामागे वसाहतवादी हिंसाचार, अपमान आणि मानवी प्रतिष्ठेचे उल्लंघन दडलेले होते. आज आम्ही ते अन्याय सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत.” तपासणीनंतर एका वैज्ञानिक समितीने हे स्पष्ट केले आहे की या कवट्या सकलावा समुदायाच्या आहेत. परंतु त्यापैकी एक कवटी खरोखरच राजा टोएरा यांची आहे का, हे अजून पूर्णपणे निश्चित झालेले नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Ramallah Raid : इस्रायली सैन्याचा पराक्रम; वेस्ट बँकमध्ये छाप्यादरम्यान पॅलेस्टिनींचे 4 कोटी रुपये जप्त
मादागास्करच्या संस्कृती मंत्री वोलामिरांती डोना मारा यांनी या क्षणाला “ऐतिहासिक न्याय” असे म्हटले. त्या म्हणाल्या –
“ही कवट्या नेणे आमच्या देशासाठी वेदनादायक ठरले होते. १२८ वर्षांपासून ही जखम आमच्या पिढ्यांच्या मनात खोलवर ठसली होती. आज त्या आपल्या भूमीत परत येत आहेत, हे आमच्यासाठी अवर्णनीय आहे.” या कवट्यांचे आता पारंपरिक विधीनुसार दहन केले जाणार आहे. स्थानिक जनतेसाठी हे एक आध्यात्मिक समाधान ठरणार आहे.
हा परतावा फ्रान्समध्ये २०२३ मध्ये पारित झालेल्या नव्या कायद्याअंतर्गत शक्य झाला आहे. या कायद्यामुळे वसाहत काळात परदेशी भूमीतून नेलेल्या वस्तू आणि मानवी अवशेष त्यांच्या मूळ देशांना परत करता येणार आहेत. या कायद्यांतर्गत मानवी अवशेष परत करण्याची ही पहिलीच घटना ठरली आहे. सध्या पॅरिसमधील मुसी डे ल’होमे संग्रहालयात जवळपास ३०,००० जैविक नमुने संग्रहित आहेत. त्यापैकी एक तृतीयांश म्हणजे कवट्या व सांगाडे आहेत. ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना यांसारखे अनेक देशही आता आपापल्या पूर्वजांचे अवशेष परत मिळवण्याची मागणी करत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Tariff : भारत अमेरिका व्यापारयुद्धावर संपूर्ण जगाची नजर; जाणून घ्या जागतिक माध्यमांनी काय लिहिले?
ही घटना फक्त अवशेषांच्या परतीची नाही, तर वसाहतवादाने केलेल्या जखमांवर फुंकर घालण्याचा प्रयत्न आहे. १९व्या शतकात युरोपीय साम्राज्यांनी जगभरातील देशांना गुलाम केले, त्यांच्या संसाधनांवर ताबा मिळवला आणि त्यांची संस्कृती उद्ध्वस्त केली. त्याचा परिणाम आजही अनेक समाजांच्या आत्म्यात दिसून येतो. राजा टोएराची कवटी परत मिळणे म्हणजे मादागास्करच्या इतिहासाचा सन्मान आहे. हा प्रसंग आफ्रिकन खंडासाठीदेखील एक प्रतीकात्मक विजय मानला जातो. १२८ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर, मादागास्करला आपला हरवलेला वारसा परत मिळत आहे. हे फक्त एका कवटीचे परतणे नाही, तर इतिहासातील जखमा भरून काढण्याचा प्रयत्न आहे. फ्रान्सचे हे पाऊल जगभरातील वसाहतवादी काळात पीडित झालेल्या देशांसाठी आशेची किरण ठरू शकते.