रशियाने पाठवले 12 हजार सैनिक
सियोल: सध्या रशिया-युक्रनेमध्ये तीव्र युद्ध सुरू आहे. दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेने (NIS) नुकतेच जाहीर केले आहे की, उत्तर कोरियाने रशियाला युक्रेनविरुद्धच्या युद्धात मदत करण्यासाठी सैनिक पाठवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 8 ते 13 ऑक्टोबर दरम्यान, रशियन नौदलाच्या जहाजांनी उत्तर कोरियाच्या विशेष ऑपरेशन्स दलातील 1,500 सैनिकांना व्लादिवोस्तोक, रशियाच्या बंदर शहरात नेले आहे. या सैनिकांना रशियन सैन्याचे गणवेश, शस्त्रास्त्रं आणि बनावट ओळखपत्रे देण्यात आली आहेत. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या सैनिकांना युद्धभूमीवर तैनात करण्याचा विचार आहे.
12 हजार सैनिक रशियाला पाठवले जातील
तसेच उत्तर कोरियाचे 12 हजार सैनिक रशियाला पाठवण्याचे उद्दिष्ट असल्याचे या अहवाल सूचित करण्यात आला आहे. मात्र याबाबत दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. यामुळे रशिया-युक्रेन युद्धात तिसऱ्या देशाच्या सहभागाची शक्यता वाढली आहे. यामुळे पश्चिमेकडील देशांसोबत तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी गुरुवारी असा दावा केला होता की, उत्तर कोरियाचे दहा हजार सैनिक युक्रेनमध्ये रशियाच्या बाजूने लढण्यास तयार आहेत.
जागतिक पातळीवर चिंता व्यक्त
युक्रेनचे पंतप्रधान झेलेन्स्की यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली आहे. या अहवालांमुळे जागतिक पातळीवर चिंता व्यक्त होत आहे. कारण उत्तर कोरियाच्या सहभागाने युद्धाचे स्वरूप आणखी गंभीर होऊ शकते. दरम्यान, रशियानेही अणुशक्तीचा पुन्हा एकदा उल्लेख करून पश्चिमेकडील देशांना युक्रेनला मदत करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला आहे. रशियाने आपल्या स्ट्रॅटेजिक न्यूक्लियर फोर्सेसच्या क्षेपणास्त्र युनिटच्या तयारीची चाचणी केली आहे.
पंतप्रधान झेलेन्स्की यांचा दावा
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन युक्रेन युद्धाच्या सुरुवातीपासूनच अण्वस्त्रांचा सर्वात मोठा साठा असल्याचा इशारा देत आहेत, ज्यामुळे युक्रेन युद्ध आणखी धोकादायक बनू शकते. उत्तर कोरियाचा सहभाग जर प्रत्यक्षात आला तर युक्रेनमधील संघर्ष नव्या पातळीवर जाईल, ज्याचे परिणाम जागतिक स्तरावर होऊ शकतात.