'...शेख हसीना यांच्या जाण्याने देशात शांतता', BNP नेत्याचा माजी पंतप्रधानांना टोमणा; भारतावरही गंभीर आरोप
नवी दिल्ली: बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (बीएनपी) वरिष्ठ नेते राहुल कबीर रिजवी यांनी माजी पंतप्रधान शेख हसीना आणि भारतावर गंभीर आरोप केले आहेत. एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी म्हटले आहे की, शेख हसीना यांनी बांगलादेशातून भारतात पळ काढल्याने देशात शांतता परतली आहे. त्यांनी दावा केला की, 15 वर्षांपासून नागरिकांच्या खांद्यावर असलेला भार आता उतरला आहे. आता बांगलादेश शेख हसीना यांना परत स्वीकारणार नाहीत.
शेख हसीना आणि भारतावरही आरोप
इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, रिजवी यांनी शेख हसीना यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, त्यांच्या जाण्याने बांगलादेशातील विविध जाती-धर्मांच्या लोकांमध्ये मोठा दिलासा मिळाला आहे. देशात आता शांततेचे वातावरण आहे. तसेच भारतावर टिका करताना त्यांनी म्हटले आहे की, भारताचे बांगलादेशाच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करणे चुकीच आहे. यामुळे बांगलादेशाच्या सार्वभौमत्वाला धोका आहे.
भारताचा हस्तक्षेप बांगलादेशासाठी धोकादायक
बीएनपी नेत्यांनी भारत सरकारवर बांगलादेशाच्या अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप केल्याचा आरोप केला. त्यांनी म्हटले की, भारत सरकार बांगलादेशाला आपला ‘आठवा भाऊ’ बनवण्याचा प्रयत्न करत आहे, यामुळे त्यांच्या ईशान्येकडील सात राज्यांना सुरक्षित ठेवता येईल. त्यांनी हे म्हटले आहे की, भारताचे हे धोरण बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठी धोकादायक आहे.
शेख हसीना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
भारतीय मीडियावरही आरोप
रिजवी यांनी भारतीय प्रसारमाध्यमांवर देखील आरोप केले आहेत. प्रसारमाध्यमांवर आरोप करताना त्यांनी म्हटले आहे की, शेख हसीना यांच्या देशातून गेल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि भारतीय प्रसारमाध्यमांनी खोट्या बातम्या पसरवल्या आहेत. बांगलादेशातील अल्पसंख्यांकांवर अत्याचार होत असल्याच्या खोट्या बातम्या प्रसारमाध्यमांनी दिल्या आहेत. यातून ते सांप्रदायिक तणाव निर्माण करत असल्याचा त्यांनी दावा केला.
अवामी लीगवर बंदी
याशिवाय, रिजवी यांनी स्पष्ट केले की, अवामी लीगवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारचा आहे आणि त्यासाठी बीएनपीला दोष देणे योग्य नाही. त्यांनी आवाहन केले की अंतरिम सरकारने अशी विधाने करू नयेत ज्यामुळे लोकशाही शक्ती कमकुवत होतील. रिजवी यांच्या या विधानांमुळे बांगलादेशातील राजकीय वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. यामुळे भारत-बांगलादेश संबंध बिघडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचाराचा भारताकडून निषेध
बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा भारतातही तीव्र निषेध होत आहे. शुक्रवारी भारताने बांगलादेशमध्ये अतिरेकी वक्तृत्व आणि हिंसाचाराच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, भारताने बांगलादेशी सरकारसमोर हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांचा मुद्दा सातत्याने मांडला आहे.