Bougainville A New Nation Potential New Front in U.S. China Rivalry
पोर्ट मोरेस्बी : प्रशांत महासागराच्या विस्तीर्ण पसरलेल्या सोलोमन बेटसमूहात स्थित एक लहान पण खनिजसंपन्न बेट ‘बोगनविले’ आता नवीन देश म्हणून उदयास येण्याच्या उंबरठ्यावर आहे. विशेष म्हणजे या घडामोडींच्या केंद्रस्थानी आहेत अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, ज्यांना बोगनविलेकडून एक ऐतिहासिक प्रस्ताव देण्यात आला आहे. बोगनविलेचे अध्यक्ष इश्माएल तोरोमा यांनी ट्रम्प यांना एक प्रस्ताव दिला असून, त्या अंतर्गत जर अमेरिका पापुआ न्यू गिनीपासून बोगनविलेला स्वातंत्र्य मिळवून देते, तर अमेरिकेला या बेटावरील खनिज संपत्तीवर विशेष हक्क दिले जातील.
बोगनविले हे बेट तांबे, सोने, चांदी, कोबाल्ट आणि निकेल अशा मौल्यवान खनिजांनी परिपूर्ण आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या उद्योगधंद्यांत रस असलेल्या नेत्यासाठी हे आकर्षणाचे केंद्र ठरू शकते. या बेटाचे भौगोलिक स्थानही अत्यंत संवेदनशील आहे. प्रशांत महासागरातील मुख्य व्यापारी मार्गांच्या जवळ असलेले हे बेट, चीनच्या ‘बेल्ट अँड रोड’ (BRI) प्रकल्पासाठीही अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे जर अमेरिका येथे आपली लष्करी उपस्थिती वाढवते, तर चीनच्या विस्तारवादी धोरणांवर थेट मर्यादा आणली जाऊ शकते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘जर मला मृत्यू आला तर असाच हवा…’ गाझातील धाडसी फोटो पत्रकार फातिमा हसौनाची हृदयद्रावक कहाणी
बोगनविलेचे स्वातंत्र्यसंग्राम काही नविन नाही. 1975 मध्ये त्यांनी स्वतःला ‘उत्तर सोलोमन प्रजासत्ताक’ म्हणून घोषित केले होते. परंतु 1976 मध्ये पापुआ न्यू गिनीने ते पुनः ताब्यात घेतले. त्यानंतर 1988 मध्ये येथे गृहयुद्ध सुरु झाले, ज्यात हजारो लोक मृत्युमुखी पडले. 1997 मध्ये मध्यस्थीद्वारे युद्ध संपले आणि 2001 मध्ये शांतता करार झाला. या करारानुसार, जनतेला स्वातंत्र्याबाबत जनमत चाचणी देण्यात आली आणि 2019 मध्ये 98% लोकांनी स्वातंत्र्याच्या बाजूने मतदान केले. आजतागायत पापुआ न्यू गिनीच्या संसदेनं बोगनविलेच्या स्वातंत्र्याला अधिकृत मान्यता दिलेली नाही.
जर डोनाल्ड ट्रम्प यांनी या प्रस्तावाला होकार दिला आणि अमेरिका बोगनविलेला मदत करू लागली, तर या बेटावर अमेरिकेचे लष्करी तळ उभे राहू शकतात. परिणामी, हे बेट चीन आणि अमेरिकेतील सामरिक संघर्षाचे केंद्र बनू शकते. चीनने आधीच या भागात आपली लष्करी उपस्थिती वाढवली आहे आणि बोगनविलेला अमेरिकेची मदत मिळाल्यास, बीजिंगला हा गंभीर धोका वाटू शकतो. यामुळे दोन महासत्ता अमेरिका आणि चीन, आमनेसामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ओमानच्या मध्यस्थीने इराण-अमेरिका ‘अणु’ चर्चेला गती; मध्यपूर्वेतील संघर्ष शमणार का?
बोगनविलेचं स्वातंत्र्य एक ऐतिहासिक पाऊल ठरू शकतं, परंतु त्याच वेळी हे बेट भविष्यातील संघर्षाची भूमी ठरण्याची भीतीही वर्तवली जात आहे. डोनाल्ड ट्रम्प जर अध्यक्षपदावर पुनरागमन करतात आणि बोगनविलेला समर्थन देतात, तर हा भाग नवीन शीतयुद्धाचा मैदान बनण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर, बोगनविलेचा जन्म एक नवीन राष्ट्र म्हणून होईल की एक संघर्षाचे केंद्र म्हणून – हे येत्या काळात स्पष्ट होईल. पण एक गोष्ट नक्की आहे – जगाच्या नकाशावर हे बेट लवकरच चर्चेच्या केंद्रस्थानी असेल.