ब्रिटनमध्ये भीषण विमान अपघात: टेकऑफनंतर काही सेकंदातच घेतला पेट
ब्रिटनमधील साउथेंड विमानतळावर आज सकाळी एक भीषण अपघात घडला असून, उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच एका छोट्या प्रवासी विमानाने पेट घेतला. ‘बीचक्राफ्ट B200’ या विमानाने नेदरलँडमधील लेलीस्टेड शहराकडे उड्डाण भरलं होतं. मात्र टेकऑफनंतर लगेचच धावपट्टीनजीक कोसळलं. दरम्यान विमानात किती प्रवासी होते आणि जीवितहानी झालीय की नाही, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.
घटनेचे दृश्य अत्यंत भयावह होते. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, काही क्षणांतच संपूर्ण विमानाने पेट घेतला . सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अनेक फोटो आणि व्हिडिओंमध्ये धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा स्पष्ट होत्या. स्थानिक वेळेनुसार सकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेने साउथेंड विमानतळावर एकच गोंधळ उडाला.
मिळालेल्या माहितीनुसार, टेकऑफनंतर अवघ्या काही वेळात विमानात तांत्रिक बिघाड झाला. इंजिन फेल झाल्याची प्राथमिक माहिती असून, त्यामुळे वैमानिकाचा विमानावरील ताबा सुटल्याने ते थेट रनवेच्या बाजूला जोरदार आवाज करत कोसळलं. अपघात इतका तीव्र होता की स्फोटाचा आवाज विमानतळ परिसरात मोठ्या अंतरापर्यंत ऐकू गेला.
या घटनेची माहिती मिळताच एसेक्स पोलीस, फायर ब्रिगेड व अॅम्ब्युलन्स सेवा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. स्थानिक प्रशासन व विमानतळ प्राधिकरणाने अपघाताच्या तपासासाठी चौकशी सुरु केली असून, अद्याप विमानात नेमके किती प्रवासी होते आणि किती जण जखमी किंवा मृत झाले याबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नाही.
या दुर्घटनेमुळे साउथेंड विमानतळावरील सर्व उड्डाणे तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आली आहेत. प्रवाशांना आणि नागरिकांना विनंती करण्यात आली आहे की, अनावश्यक प्रवास टाळावा आणि विमानतळाच्या अधिकृत संकेतस्थळावर सातत्याने अपडेट्स तपासत राहावं.
ही दुर्घटना ऐकताच महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. विशेषतः ब्रिटनमध्ये वास्तव्यास असलेल्या मराठी कुटुंबांचे नातेवाईक आपल्या प्रियजनांच्या सुरक्षेबाबत चिंतित आहेत. गेल्या काही वर्षांत परदेशात शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील तरुणांची संख्या मोठी आहे आणि त्यात अनेकजण युरोपातील विविध शहरांमध्ये प्रवास करत असतात.
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर कधी परतणार? जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय हवाई सुरक्षा आणि आपत्कालीन यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तांत्रिक बिघाडामुळे उड्डाणानंतर अवघ्या काही क्षणांतच विमान दुर्घटनाग्रस्त होणं ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. सध्या बचावकार्य सुरू असून, अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी विमानचालन सुरक्षा प्राधिकरणाकडून तपास सुरू करण्यात आला आहे.