कीव : गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमधील युद्ध तीव्र झाले आहे. रशियाने युक्रेनच्या अनेक भागांवर तीव्र हल्ले केले आहेत. यामुळे युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. याच दरम्यान एक मोठी माहिती समोर आली आली आहे. युक्रेनने कीवमध्ये दोन रशियान एजंट्सना ठार केले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या दोन गुप्तहेरांचा युक्रेनच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हत्येशी संबंध होता. यामुळे युक्रेनने या दोन संशयितांना शोधून काढले आणि गोळ्या झाडून ठार केले आहे. युक्रेनच्या सुरक्षा सेवेने (SBU)ने रविवारी १३ जुलै रोजी याची माहिती दिली. युक्रेनच्या सुरक्षा सेवेने (SBU) म्हटले की, दोन्ही रशियन एजंट्स अटक टाळण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी कीव प्रदेशात दोन्ही संशयितांना गोळ्या घालून मारण्यात आले.
त्यांनी सांगितले की, दोन्ही संशयित एसबीयू कर्नल इव्हान व्होरोनिच यांच्या हत्येत सामील होते. गुरुवारी १० जुलै रोजी एसबीयू कर्नल इव्हान व्होरोनिच यांची हत्या करण्यात आली होती. यामध्ये एक महिला आणि पुरुषाचा समावेश होता. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. त्यानंतर युक्रेनने या घटनेचा तपास सुरु केला होता. दरम्यान दोन्ही संशयितांना कीवमध्ये ठार केले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, एसबीयू कर्नल इव्हान व्होरोनिच रशियाच्या ताब्यातील युक्रेनियन प्रदेशात गुप्त कारवाईत सहभागी होते. गेल्या वर्षी रशियाने कुर्स्क प्रदेशावर अचानक हल्ला केला होता. या भयंकर हल्ल्यांना रोखण्यासाठी एसबीयू कर्नल इव्हान व्होरोनिच यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
दरम्यान युक्रेनच्या हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून रशियाचे ड्रोन हल्ले सुरुच आहेत. शनिवारी (१२ जुलै) रात्री रशियाने युक्रेनवर ६० ड्रोन हल्ले केले. यातील २० ड्रोन पाडल्याचा दावा युक्रेनच्या हवाई दलाने केला आहे. युक्रेनने दिलेल्या माहितीनुसार, डोनेस्तक आणि खेरसन भागामद्ये रशियाने हल्ले केले आहेत. यामध्ये चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर १३ जण जखमी झाले आहेत.
गेल्या दोन वर्षाहून अधिक काळ रशिया आणि युक्रनेमध्ये युद्ध सुरु आहे. रशियाने शनिवारी १२ जुलै रोजी युक्रेनच्या चेर्निव्हत्सीमध्ये तीव्र हल्ले केले आहेत. यामध्ये दोन जण ठार तर ३८ जखमी झाले आहे. शिवाय खार्किव्ह, ल्विव्ह, लुत्स्क आणि सुमी सारख्या शहरांना देखील लक्ष्य केले जात आहे. जुलै महिन्यात रशियाचा युक्रेनवरील तिसरा मोठा हल्ला आहे. सध्या रशियाने डोनेत्स्क प्रदेशातील मायकोलाईव्का आणि मिर्ने शहरे ताब्यात घेतली आहे. सध्या रशिया-युक्रेन युद्ध आणखी तीव्र होताना दिसत आहे.