'आम्ही पाकिस्तानसोबत'; चीनने स्पष्ट केली भूमिका
नवी दिल्ली : पाकिस्तानकडून केले जात असलेल्या भ्याड हल्ल्यांना भारताकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. भारताने शनिवारी पहाटे पाकिस्तानातील सहा प्रमुख लष्करी हवाई तळांवर शक्तिशाली स्फोटाने उडवले. यात पाकिस्तानी लष्करी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील तणाव वाढत आहेत. असे असतानाच चीनने भारताविरोधी भूमिका घेत पाकिस्तानला पाठिंबा असल्याचे म्हटले आहे.
चीनने पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे. ‘पाकिस्तानचे ‘सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य’ राखण्यासाठी त्याच्यासोबत उभा राहील’, असे चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी सांगितले. वांग यी यांनी पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांच्याशी दूरध्वनीवरून झालेल्या चर्चेदरम्यान या गोष्टी सांगितल्या. तर उपपंतप्रधान दार यांनी यूएईचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद यांच्याशीही चर्चा केली. ज्यांनी पाकिस्तान आणि भारत यांच्यातील युद्धबंदी कराराचे स्वागत केले. दार यांनी तुर्कीचे परराष्ट्र मंत्री हकान फिदान यांच्याशीही चर्चा केली आणि त्यांना या प्रदेशातील सध्याच्या परिस्थितीची माहिती दिली.
दरम्यान, पाकिस्तानच्या चकवाल जिल्ह्यात असलेले मुरीद एअरबेस गेल्या दोन दिवसांत भारताला लक्ष्य करणाऱ्या ड्रोन ऑपरेशन्सचे केंद्र म्हणून उदयास आले आहे. येथे शाहपर-1 आणि बायरक्तार टीबी 2 सारख्या प्रगत यूएव्ही आणि यूसीएव्ही चालवणारे अनेक पाकिस्तानी हवाई दलाचे स्क्वॉड्रन आहेत.
पाकिस्तानच्या ड्रोन युद्ध कार्यक्रमात हे तळ महत्त्वाची भूमिका बजावते, पाळत ठेवणे, हल्ले करणे आणि गुप्तचर माहिती गोळा करण्यात मदत करते. या सुविधेवरून सोडण्यात आलेल्या शेकडो ड्रोनना थेट प्रत्युत्तर म्हणून भारताने या हवाई तळावर हल्ला केला.
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा संदेश
दहशतवादाविरुद्ध कारवाई करण्यासाठी आता कोणाच्याही परवानगीची आवश्यकता नसल्याचे भारताने स्पष्ट केले. हा संदेश केवळ पाकिस्तानसाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी आहे की, भारत आपल्या नागरिकांच्या सुरक्षेशी तडजोड करणार नाही. एकंदरीतच भारताने संपूर्ण जगाला एक योग्य संदेश याद्वारे दिला असल्याचे दिसून आले.