China's live-fire drills near Taiwan prompted Taiwan to deploy troops Wednesday
तैपई/बीजिंग : चीन आणि तैवान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. चीनने तैवानच्या जवळ मोठ्या प्रमाणावर ‘लाइव्ह फायर’ लष्करी सराव करण्याची घोषणा केल्यानंतर तैवानने तत्काळ आपले सैन्य तैनात केले आहे. या कृतीला तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने ‘धोकादायक आणि आक्रमक पाऊल’ म्हणून संबोधले आहे.
चीनचा आक्रमक पवित्रा – 32 लढाऊ विमाने तैनात
चीनच्या लष्करी हालचालींनी संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. बीजिंगने तैवानच्या दक्षिण भागापासून अवघ्या ७४ किलोमीटर अंतरावर ‘लाइव्ह फायर’ लष्करी सराव सुरू केला आहे. यासोबतच, चीनने आपल्या 32 लढाऊ विमानांची तैनाती करत तैवानभोवती लष्करी उपस्थिती वाढवली आहे. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले असून, नौदल, हवाई दल आणि लष्कराला उच्च सतर्कतेवर ठेवण्यात आले आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तैवान लष्करी तयारी वाढवत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ट्रम्प यांचा भारतासोबत डबल गेम! PM मोदींना F-35 ची ऑफर देऊन पाकिस्तानला ‘या’ कारणासाठी दिले लाखो डॉलर्स
तैवान-चीन तणावाच्या मुळाशी काय?
चीनने तैवानला नेहमीच आपला अविभाज्य भाग मानले आहे, तर तैवान हा दावा फेटाळून लावत आपली स्वतंत्र ओळख जपण्यावर ठाम आहे. तैवानच्या मते, त्यांच्या देशाचे भवितव्य ठरवण्याचा हक्क फक्त तैवानी जनतेचा आहे आणि बीजिंगने याचा आदर करावा. चीनच्या राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी त्यांच्या नवीन वर्षाच्या भाषणात तैवानच्या स्वायत्ततेचे समर्थन करणाऱ्यांना थेट धमकी दिली होती. त्यांनी ठाम शब्दांत सांगितले की, “तैवान आणि चीनचे एकत्रीकरण कोणीही रोखू शकत नाही.” तैवानच्या अधिकाऱ्यांनी चीनच्या या वक्तव्याला ‘सामरिक दडपशाही’ असे संबोधले असून, बीजिंग आपल्या लष्करी हालचालींना अधिकृत रूप देण्याचा प्रयत्न करत आहे, असे ते म्हणाले.
मे 2024 नंतर तणाव अधिक तीव्र
तैवान आणि चीन यांच्यातील संघर्ष काही दिवसांचा नाही. गेल्या अनेक दशकांपासून हा वाद सुरू आहे. मात्र, मे २०२४ मध्ये लाय चिंग-ते यांनी तैवानच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर हा तणाव आणखी वाढला आहे. चीनने त्यांना ‘अलिप्ततावादी नेता’ ठरवले असून, ते तैवानच्या स्वातंत्र्याला पाठिंबा देतात असा आरोप केला आहे. लाय चिंग-ते यांच्या सत्ताग्रहणानंतर चीनने आतापर्यंत तीन वेळा मोठ्या लष्करी सरावांचे आयोजन केले आहे. बीजिंगने आधीच स्पष्ट केले आहे की, तैवानवर नियंत्रण मिळवण्यासाठी लष्करी कारवाई हा पर्याय कायम ठेवला जाईल. त्यामुळे भविष्यात चीनकडून मोठ्या सैन्य हालचाली होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nostradamus Prediction : नॉस्ट्राडेमसची ‘ही’ भविष्यवाणी आहे आणि पोप फ्रान्सिस यांच्या प्रकृतीशी संबंधित
युद्धाच्या छायेत आशिया आणि संपूर्ण जग
चीन-तैवान संघर्ष हा केवळ या दोन देशांपुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण आंतरराष्ट्रीय राजकारणाला त्याचा मोठा प्रभाव पडू शकतो. अमेरिकेने तैवानच्या बाजूने भूमिका घेतली असून, कोणत्याही परिस्थितीत तैवानच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे चीन जर तैवानवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करत असेल, तर अमेरिका आणि चीनमध्ये थेट संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आशियातील या संघर्षाकडे संपूर्ण जग डोळे लावून आहे. चीनच्या आक्रमक भूमिकेमुळे तैवानमध्ये अस्थिरता वाढली असून, हा संघर्ष थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मध्यस्थी करण्याची मागणीही वाढत आहे. आगामी काळात चीन आणि तैवानमधील संघर्ष काय वळण घेईल, याकडे सगळ्यांचे लक्ष राहील.