Chinese and Canadian scientists found evidence of growing life deep within Earth
Deep Subsurface Life : जगभरातील वैज्ञानिक अवकाशात जीवनाचा शोध घेत असताना, चीन आणि कॅनडाच्या शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या अगदी खोलवर एक अद्भुत शोध लावला आहे. सूर्यकिरण कधीच न पोहोचलेल्या अंधाऱ्या गर्भात जीवन फुलत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, हे जीव आपल्या ग्रहाच्या आत होणाऱ्या भूकंपांमधूनच ऊर्जा मिळवतात.
अलिकडेपर्यंत विज्ञान जगताचा ठाम समज होता की, पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली काही किलोमीटरवर जीवन असणे अशक्य आहे. पण चायनीज अकादमी ऑफ सायन्सेसच्या ग्वांगझू इन्स्टिट्यूट ऑफ जिओकेमिस्ट्रीचे प्रा. झू जियानक्सी, ही होंगपिंग आणि अल्बर्टा विद्यापीठाचे प्रा. कर्ट कोनहॉसर यांच्या नेतृत्वाखालील संशोधनाने हा समज मोडून काढला आहे. सायन्स ॲडव्हान्सेस या प्रतिष्ठित जर्नलमध्ये प्रकाशित या अभ्यासात खोल गर्भात प्रचंड प्रमाणात सूक्ष्मजीव विशेषतः प्रोकेरिओट्स अस्तित्वात असल्याचे सिद्ध झाले. हे एककोशिकीय जीव असून त्यांना पेशीतील पडद्याने वेढलेले ऑर्गेनेल्स नसतात. संशोधनानुसार, पृथ्वीवरील एकूण सूक्ष्मजीवसंख्येपैकी तब्बल ९५% एवढा हिस्सा या गर्भातील जीवांचा असू शकतो!
या जीवांच्या अस्तित्वाचे रहस्य म्हणजे पृथ्वीच्या आत होणारे भूकंप. खोल अंधारात, जिथे सूर्यप्रकाश पोहोचत नाही, तिथे खडक व पाण्यातील रासायनिक परस्परसंवादातून ऊर्जा तयार होते. ही ऊर्जा बॅटरीसारखी काम करत इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह निर्माण करते जो जीवनचक्राला आवश्यक असतो. प्रयोगशाळेत ‘क्वार्ट्ज’ या पृथ्वीवरील सर्वाधिक सामान्य खनिजाचे मॉडेल तयार करून, खडक अचानक तुटल्यावर पृष्ठभाग पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर निर्माण होणाऱ्या रासायनिक प्रतिक्रियांचा अभ्यास करण्यात आला. यातून पाण्याचे रेणू तुटून हायड्रोजन वायू आणि प्रतिक्रियाशील ऑक्सिजन तयार होतात जे सूक्ष्मजीवांच्या जीवनासाठी इंधनाचे काम करतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : डंकी रूटच्या शेवटच्या दरवाजाला का म्हटले जाते मृत्यूचे द्वार? वाचा याबाबत धक्कादायक तथ्ये
पृथ्वीच्या खोलवर असलेल्या या जीवांना तीव्र अतिनील किरणोत्सर्ग, उल्कापात किंवा हवामानातील अचानक बदलांचा काहीच परिणाम होत नाही. यामुळे जीवनाच्या उत्पत्ती व विकासाच्या दृष्टीने हे वातावरण अत्यंत स्थिर आणि पोषक आहे. मध्यम तीव्रतेच्या भूकंपांमधून निर्माण होणारे हायड्रोजन फ्लक्स आणि उच्च दाब-तापमानातील रासायनिक अभिक्रिया हे जीवन टिकवून ठेवण्यासाठी पुरेसे आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : महासत्तांचा नवा डावपेच! चंद्रावर अणुऊर्जा तळ उभारण्यासाठी ‘या’ देशांमध्ये सुरु झालीये अनोखी अंतराळ स्पर्धा
आतापर्यंत अवकाशातील ग्रहांवर विशेषतः मंगळावर जीवनाचा शोध घेण्यात जगातील अव्वल अंतराळ संस्था गुंतलेल्या होत्या. परंतु चीन-कॅनडाच्या या संयुक्त संशोधनाने आपल्याच पायाखाली एक प्रचंड, अदृश्य बायोस्फीअर असल्याचे दाखवून विज्ञानक्षेत्रात नवे दालन उघडले आहे. या शोधामुळे जीवनाच्या मर्यादा व त्याच्या उत्क्रांतीबद्दलची आपली समज पूर्णपणे बदलू शकते. पृथ्वीच्या आत लपलेले हे सूक्ष्मजीव कदाचित आपल्याला केवळ पृथ्वीवरील नव्हे, तर इतर ग्रहांवरील जीवनाच्या शक्यता समजून घेण्यासाठीही महत्त्वाची किल्ली देऊ शकतात. भविष्यातील संशोधन यातून किती नवे रहस्य उलगडते, हे पाहणे रंजक ठरणार आहे.