चंद्रावर अणुऊर्जा तळ उभारण्यासाठी नवी स्पर्धा; अमेरिका विरुद्ध रशिया-चीनची ‘अवकाश शर्यत' ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Moon nuclear base race : अवकाश संशोधनाच्या इतिहासात नवी पानं लिहिली जात आहेत. १९६० च्या दशकात जगाने पाहिलेली ‘चंद्रावर पोहोचण्याची’ पहिली शर्यत आता एका वेगळ्याच रूपात परतली आहे. यावेळी उद्दिष्ट फक्त ध्वज रोवण्याचे नाही, तर चंद्रावर पहिला अणुऊर्जा तळ (Nuclear Power Plant) उभारण्याचे आहे. या स्पर्धेत एका बाजूला अमेरिका आहे, तर दुसऱ्या बाजूला रशिया आणि चीनची एकत्रित युती आणि या तिन्ही महासत्ता चंद्रावर उर्जेचा स्थायी स्रोत निर्माण करण्यासाठी झगडत आहेत.
चंद्रावरील एक दिवस आणि एक रात्र, प्रत्येकी तब्बल १४ पृथ्वी दिवस इतकी लांब असते. या लांब, गोठवणाऱ्या अंधाऱ्या रात्रीत सौर पॅनेल आणि बॅटऱ्यांवर अवलंबून राहणे अशक्य आहे. म्हणूनच, २४ तास अखंड वीज पुरवणारी अणुभट्टी हा एकमेव पर्याय मानला जातो. अशी भट्टी असली, तर चंद्रावर मानवी वस्ती शक्य होईल, प्रकाश-उष्णता मिळेल आणि त्या भागावर नियंत्रण ठेवण्याची संधीही मिळेल. काही तज्ञांचे म्हणणे आहे की, पहिला अणुतळ बसवणारा देश चंद्राच्या काही भागाला ‘कीप आऊट झोन’ घोषित करून इतरांना दूर ठेवू शकतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : समुद्रातील थरार! फिलीपिन्सच्या बोटीचा पाठलाग करताना चिनी जहाजे एकमेकांवरच आदळली; पाहा धक्कादायक VIRAL VIDEO
अमेरिकेच्या नासाने २०३० पर्यंत चंद्रावर १०० किलोवॅट क्षमतेची अणुभट्टी बसवण्याचे ध्येय ठरवले आहे. यासाठी शास्त्रज्ञांना वेगाने काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नासाचे स्टारशिप लूनर लँडर सध्या चाचणी टप्प्यात आहे. अनेक नवे तंत्रज्ञान वापरण्याची तयारी सुरू आहे, परंतु हे आव्हान सोपे नाही.
२०२१ मध्ये रशिया आणि चीन यांनी ‘आंतरराष्ट्रीय चंद्र संशोधन केंद्र’ उभारण्याचा करार केला. योजनेनुसार, २०३३ ते २०३५ दरम्यान चंद्रावर अणुभट्टी उभारण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. यावर्षी मे महिन्यात, रशियाची रोसकॉसमॉस आणि चीनची CNSA या दोन अवकाश संस्थांनी औपचारिक करारावर स्वाक्षरी केली. रशियन शास्त्रज्ञांचा दावा आहे की, तंत्रज्ञान आणि अनुभव या दोन्ही बाबतीत त्यांना अमेरिकेवर आघाडी आहे. चीन मात्र आपले अंतराळ तंत्रज्ञान गुप्त ठेवत आला आहे, परंतु या प्रकल्पासाठी त्याला रशियासोबत ते वाटून घ्यावे लागेल.
१९६० च्या दशकातील पहिल्या चंद्रशर्यतीत अमेरिका आणि सोव्हिएत युनियन आमनेसामने होते. अखेरीस, २० जुलै १९६९ रोजी नील आर्मस्ट्राँगच्या पहिल्या पावलांनी अमेरिका विजयी ठरली आणि इतिहास बदलला. पण ५५ वर्षांनंतर पुन्हा एकदा शर्यत सुरू झाली आहे, गंतव्य तोच चमकणारा चंद्र, पण उद्दिष्ट वेगळे, पहिली अणुभट्टी बांधणे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ऊर्जाक्षेत्रात रशियाची LNG झेप; जागतिक ऊर्जा खेळातील नवा मोहरा, अमेरिका–युरोपलाही नितांत गरज
या नव्या ‘अवकाश युद्धा’चा निकाल कोणाच्या बाजूने जाईल हे सांगणे अवघड आहे. अमेरिका आपली तांत्रिक ताकद आणि वेगावर भर देत आहे, तर रशिया-चीनची युती संयुक्त साधनसंपत्तीवर विसंबून आहे. कोण पहिला अणुऊर्जा तळ बसवणार, यावरच चंद्रावरील भावी मानवी वस्ती, उर्जेचा स्रोत आणि कदाचित तिथल्या भूभागावरचे नियंत्रण अवलंबून असेल. इतिहास पुन्हा लिहिला जाणार आहे. प्रश्न एवढाच — हा विजय अमेरिकेच्या खात्यात जाणार का, की रशिया-चीनची युती नवा अध्याय लिहिणार?