नवी दिल्ली – इस्रायलची संसद बरखास्त करण्यात आली आहे. विशेष विधेयक मंजूर करून नव्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. नवीन निवडणुका घेण्यास सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला आहे. आता १ नोव्हेंबरला नवीन निवडणुका होणार आहेत. २०१९ ते २०२२ मधील ही पाचवी निवडणूक असेल. नफताली बेनेट सरकारमध्ये क्रमांक दोनवर असलेल्या येर लॅपिड यांना काळजीवाहू सरकारची जबाबदारी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी माजी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू पाठिंबा गोळा करून पुन्हा पंतप्रधान होऊ शकतात, असे मानले जात होते. मात्र, नंतर नव्याने निवडणुका घेणे योग्य ठरेल, असा निर्धारही त्यांनी केला.
टाईम्स ऑफ इस्रायलमधील वृत्तानुसार, बेनेटने सत्ता गमावली कारण त्यांना नेतान्याहूंप्रमाणे युती कशी सांभाळतात हे माहित नव्हते. बेनेटचे सरकार अशा वेळी पडले जेव्हा इराणने इस्रायलला गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली. बेनेट सरकारमधील परराष्ट्र मंत्री राहिलेल्या येर लॅपिड कार्यवाहक पंतप्रधान बनतील, परंतु त्यांना निवडून आलेल्या पंतप्रधानासारखे अधिकार नसतील. मात्र, त्यामुळे फारसा फरक पडणार नाही, कारण इस्रायलकडे देशाची सुरक्षा आणि प्रशासन यासाठी योग्य यंत्रणा आहे.