Erdogan's Mediterranean move risks India's allies Egypt Greece
Turkey Greece tension : तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान हे इस्लामिक जगताचे ‘खलिफा’ बनण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी भूमध्य समुद्रात विस्तारवादी धोरण राबवत असून, यामुळे भारताचे दोन महत्त्वाचे मित्र इजिप्त आणि ग्रीस अडचणीत आले आहेत. तुर्कीने लिबियाच्या पूर्व भागातील संसदेवर दबाव टाकून 2019 मध्ये झालेल्या सागरी कराराला मान्यता देण्याची तयारी सुरू केली आहे. हा करार लागू झाल्यास, तुर्कीला भूमध्य समुद्रातील प्रचंड तेल आणि गॅस साठ्यांवर दावा करता येईल, ज्यामुळे संपूर्ण प्रदेशातील भौगोलिक समीकरणं बदलू शकतात.
ताज्या घडामोडींनुसार, इजिप्तने अमेरिकेकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे. इजिप्तचे परराष्ट्र मंत्री बद्र अब्देलट्टी यांनी आफ्रिकेसाठी अमेरिकेचे वरिष्ठ सल्लागार मसाद बोलोस यांची भेट घेतली. या बैठकीत इजिप्तने अमेरिकेला विनंती केली की, लिबियाच्या पूर्व सरकारला तुर्कीसोबतच्या कराराला मान्यता देण्यापासून रोखावे. इजिप्तचा इशारा आहे की, जर हा करार पारित झाला, तर संपूर्ण पूर्व भूमध्य समुद्रात तणावाची शक्यता आहे – विशेषतः जेव्हा गाझा आणि सुदानमध्ये युद्धसदृश परिस्थिती आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : खळबळजनक! पाकिस्तानने चीनच्या मदतीने कशी उभी केली ‘किल चेन’? अमेरिकेच्या विरोधात ड्रॅगनची रणनिती उघड
लिबियामधील शक्तिशाली नेता खलिफा हफ्तर याच्याकडे लिबियाच्या पूर्व भागाचा ताबा आहे. हफ्तरला युएई, फ्रान्स, अमेरिका आणि रशियाचा पाठींबा आहे. पूर्वी त्याने तुर्कीविरोधात भूमिका घेतली होती, पण अलीकडे तो तुर्कीच्या बाजूने झुकताना दिसत आहे. हफ्तरचा मुलगा सद्दाम तुर्कीसोबत लष्करी संबंध वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. तुर्कीने हफ्तरला शस्त्रास्त्रे, भाडोत्री सैनिक आणि संरक्षण मदत दिली आहे. त्यामुळे इजिप्तने संताप व्यक्त केला असून, ग्रीसनेही यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.
गेल्या काही वर्षांत ग्रीस आणि तुर्कीमध्ये सागरी हद्दीवरून संघर्ष सुरू आहे. 2019 मध्ये, लिबियाच्या पश्चिम सरकारने तुर्कीसोबत सागरी करार केला होता, ज्याला ग्रीस आणि इजिप्त दोघांनीही आक्षेप घेतला होता. या कराराच्या उत्तरादाखल ग्रीसने इजिप्तसोबत स्वतंत्र सागरी करार केला. आता पूर्व लिबियाची संसद जर तुर्की-लिबिया कराराला मान्यता देते, तर तुर्कीच्या सागरी क्षेत्रातील प्रभावात मोठी वाढ होईल. यामुळे ग्रीस आणि इजिप्तसाठी धोका अधिक गडद होईल.
या सर्व संघर्षामागे पूर्व भूमध्य समुद्रात आढळणारे प्रचंड तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे हे मुख्य कारण आहे. तुर्कीच्या लिबिया धोरणामागे याच संपत्तीवर दावा मिळवण्याचा उद्देश आहे. जून महिन्यात लिबियाच्या तेल कंपनीने तुर्कीसोबत समुद्राखालील तेल शोध मोहिमेसाठी करार केला आहे, ज्यामुळे इजिप्त आणि ग्रीसचे चिंतेत पडणे स्वाभाविक आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India‑US interim trade deal : भारत आणि अमेरिकेत 48 तासांत होणार मोठा व्यापार करार; ट्रम्प यांच्याशी चर्चा सुरू
इजिप्त आणि ग्रीस हे भारताचे रणनीतिक मित्र आहेत. अलीकडेच इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष भारतात आले होते आणि संरक्षण, ऊर्जा आणि व्यापारविषयक करार झाले. त्यामुळे तुर्कीच्या आक्रमक धोरणाने भारतालाही काळजी करण्याची गरज आहे.
तुर्कीच्या विस्तारवादी पवित्र्यामुळे भूमध्य समुद्रात शांततेचा गंभीर अपाय होऊ शकतो. इजिप्त आणि ग्रीसच्या आक्षेपांवर अमेरिका काय भूमिका घेते, यावर या संपूर्ण संघर्षाचे भवितव्य अवलंबून असेल. तुर्कीने ‘खलिफा’ बनण्याचा मार्ग निवडल्यास, भूमध्य समुद्रातील भू-राजकीय स्थिती आणखी धोकादायक वळण घेऊ शकते.