Pakistan kill chain strategy : भारत आणि पाकिस्तान यांच्यात मे महिन्यात झालेल्या संघर्षाने जागतिक संरक्षण तज्ज्ञांना हादरवून सोडले आहे. या संघर्षात पाकिस्तानने चीनच्या मदतीने ‘किल चेन’ म्हणजेच एक सुसंगत आणि समन्वयित हल्ला यंत्रणा तयार करून भारताच्या हवाई दलाला थेट आव्हान दिले. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित ‘स्टडी टाईम्स’ या वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या लेखानुसार, हे युद्ध भविष्यातील आधुनिक संघर्षांचे संकेत देणारे होते.
‘किल चेन’ युद्धाचा नवा चेहरा
‘स्टडी टाईम्स’ने प्रकाशित केलेल्या अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे की, भारताच्या राफेल लढाऊ विमानांना सामोरे जाण्यासाठी पाकिस्तानने चीनच्या J-10CE लढाऊ विमानांचा, PL-15 हायटेक क्षेपणास्त्रांचा आणि चिनी गुप्तचर उपग्रहांचा वापर केला. ही ‘किल चेन’ युद्धसंकल्पना म्हणजे, युद्धाच्या सर्व घटकांमध्ये एकत्रित संवाद आणि समन्वय निर्माण करून शत्रूवर अचूक आणि संपूर्ण नियंत्रण ठेवण्याची यंत्रणा होय. पाकिस्तानने या युद्धात दावा केला आहे की त्यांनी भारताची अनेक लढाऊ विमाने पाडली. भारताने यातील काही बाबींची कबुली दिली असली, तरी नेमकी संख्या किंवा कोणती विमाने होती याची माहिती अद्याप उघड केलेली नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India‑US interim trade deal : भारत आणि अमेरिकेत 48 तासांत होणार मोठा व्यापार करार; ट्रम्प यांच्याशी चर्चा सुरू
चीनची ‘सिस्टिमॅटिक वॉरफेअर’ संकल्पना
चीनने या संघर्षातून ‘सिस्टिमॅटिक वॉरफेअर’ म्हणजे युद्धाच्या विविध क्षेत्रांमध्ये (हवा, जमीन, सायबर, अवकाश) एकत्रित हालचाल कशी करता येईल याचा प्रयोग केला. लेखात म्हटले आहे की, फक्त शस्त्रांची गुणवत्ता नव्हे, तर विविध तंत्रज्ञानांचा समन्वय निर्णायक ठरतो. चीनने यानिमित्ताने आपली युद्धसिद्धता तपासली. लेखात स्पष्ट करण्यात आले आहे की, ही युद्धपद्धती भविष्यातील संघर्षांचे नकाशे ठरवू शकते. ही संकल्पना केवळ पाकिस्तानपुरती मर्यादित नाही, तर चीनने तैवानविरोधातील भविष्यातील युद्धासाठीही याचे मूल्यांकन केले आहे.
अमेरिकेविरोधात ड्रॅगनची तयारी
लेखात ‘किल वेब’ आणि ‘सेन्सर टू शूटर नेटवर्क’ या तांत्रिक संकल्पनांचा उल्लेख आहे. चीनने 470 हून अधिक उपग्रह अंतराळात पाठवले असून, हे उपग्रह अमेरिकेच्या लष्करी हालचालींवर सतत लक्ष ठेवतात आणि तात्काळ माहिती सामायिक करू शकतात. यामुळे चीन आता केवळ शस्त्रास्त्रांचा पुरवठादार नसून, तो रणनीतीचा मार्गदर्शक म्हणूनही उदयास आला आहे.
भारतासाठी इशारा आणि आव्हान
या संपूर्ण प्रक्रियेत भारतासाठी सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतो. भारतीय तिन्ही सैन्यदलांनी एकात्मिक ‘किल चेन नेटवर्क’ तयार केले आहे का?
भारताकडे राफेल, SU-30MKI, S-400 यांसारखी प्रगत शस्त्र प्रणाली असली, तरी जर त्या एकत्रित आणि समन्वयित स्वरूपात वापरल्या जात नसतील, तर भविष्यात भारताला तांत्रिकदृष्ट्या मागे पडण्याचा धोका आहे. लेखात म्हटले आहे की, भविष्यातील युद्धे आश्चर्यजनक, वेगवान आणि गोंधळ निर्माण करणारी असतील. अशा स्थितीत डेटा शेअरिंग, रिअल टाइम कमांड आणि सिस्टीम ऑफ सिस्टीम्स म्हणजेच सर्व यंत्रणांचा एकत्रित वापर अत्यावश्यक ठरेल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : चीन करत आहे तिसऱ्या महायुद्धाची तयारी? बीजिंगजवळ अणुहल्ला झेलू शकणारे गुप्त लष्करी शहर उभारले
चीन-पाकिस्तानच्या भागीदारी
चीन-पाकिस्तानच्या भागीदारीने निर्माण केलेली ‘किल चेन’ ही भारतासाठी एक गंभीर इशारा आहे. भारताच्या सैन्यदलांना आता केवळ शक्तिशाली शस्त्रास्त्रांच्या खरेदीपुरते मर्यादित न राहता, त्या सर्व घटकांमध्ये समन्वय साधणारी रणनिती उभारण्याची गरज आहे. अन्यथा तांत्रिकदृष्ट्या सामर्थ्यशाली असूनही, नेटवर्क युध्दात भारत पिछाडीवर राहू शकतो.