France nuclear‑capable Rafale : रशियाच्या अणुशक्तीच्या वाढत्या प्रभावाला थेट उत्तर देत, फ्रान्सने नव्या आण्विक युगाची सुरुवात केल्याची जाहीर घोषणा केली आहे. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मंगळवारी( दि. 24 जून 2025 ) लक्सिल येथे अत्याधुनिक एअरबेस उभारण्याचा निर्णय जाहीर केला असून, येथे ४० हून अधिक अत्याधुनिक सुपर राफेल F5 लढाऊ विमाने तैनात करण्यात येणार आहेत. ही विमाने ASN4G हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांनी सज्ज असणार आहेत, जी अणुबॉम्ब डागण्यास सक्षम आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटोच्या सुरक्षापटबंधांबाबत घेतलेल्या साशंक भूमिकेमुळे युरोपमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा वेळी फ्रान्सने स्वतःच्या अणुरोधक क्षमतेला बळकट करण्यासाठी हा मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय केवळ रशियालाच नव्हे, तर अमेरिका आणि ट्रम्प यांनाही एक स्पष्ट इशारा आहे. फ्रान्स आपल्या संरक्षणासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहणार नाही.
लक्सिलमध्ये फ्रान्सचा नवा अण्वस्त्र तळ
या प्रकल्पासाठी फ्रान्स सरकारने $1.6 अब्ज (सुमारे ₹13,200 कोटी) इतकी प्रचंड गुंतवणूक जाहीर केली आहे. २०३२ पर्यंत पहिला राफेल स्क्वाड्रन आणि २०३६ पर्यंत दुसरा स्क्वाड्रन तैनात केला जाणार आहे. ही विमाने अत्याधुनिक F5 स्टँडर्डची असून, ASN4G हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे बसवलेली ही विमाने, पारंपरिक राफेलपेक्षा अधिक धोकादायक आणि जलद आहेत. या निर्णयामुळे फ्रान्सच्या अण्वस्त्र प्रतिकार क्षमतेत लक्षणीय वाढ होणार असून, संपूर्ण युरोपातील संरक्षण व्यवस्थेचे समीकरण बदलू शकते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel- Iran War: भारतासाठी दिलासादायक बातमी! इराणने हवाई क्षेत्र केले खुले; Operation Sindhu’द्वारे 1000 भारतीय मायदेशी परतणार
ट्रम्प-पुतिनला स्पष्ट संदेश
या एअरबेसच्या घोषणेनंतर राजकीय व लष्करी क्षेत्रात अनेक चर्चांना सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, या घोषणेच्या अगोदरच ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात चर्चा झाली होती, आणि त्याच दिवशी फ्रान्सने हा मोठा निर्णय घेतला. त्यामुळे फ्रान्सने दोघांनाही अप्रत्यक्ष इशारा दिला आहे – की युरोपच्या सुरक्षेसाठी त्यांना अमेरिका आवश्यक नाही. फ्रान्सने यापूर्वीच ४२ अतिरिक्त राफेल विमानांची ऑर्डर दिली आहे, आणि नवीन तळ त्याच निर्णयाचा विस्तार आहे.
फ्रान्सचा आण्विक विस्तार
फ्रान्सकडे सध्या सेंट-डिझियर, इस्टेरे आणि एव्हॉर्ड या तीन हवाई तळांवर आण्विक क्षमतेची राफेल विमाने आहेत. ही विमाने ASMP-A सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असून, A330 MRTT हवाई टँकरच्या मदतीने हवेत इंधन भरता येते. २०१५ पर्यंत फ्रान्सकडे ५४ ऑपरेशनल ASMP-A क्षेपणास्त्रे होती. मात्र आता, ASN4G हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे येणार असल्यामुळे फ्रेंच आण्विक शक्तीला नवा आयाम मिळणार आहे.
भारतासाठीही महत्त्वाची संधी
भारतही राफेल लढाऊ विमानांचा मोठा खरेदीदार असून, फ्रान्सच्या या तंत्रज्ञानवाढीकडे भारताचेही लक्ष लागून आहे. ASN4G क्षेपणास्त्र प्रणाली आणि सुपर राफेल विमाने ही भारताच्या भविष्यातील संरक्षण धोरणासाठी उपयुक्त ठरू शकतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel- Iran War: इराण इस्त्रायल युद्ध पार्श्ववभूमीवर ‘हा’ अनोख्या मिसाइलचा VIDEO सोशल मीडियावर का होतोय इतका VIRAL??
फ्रान्सचा हा निर्णय जागतिक अण्वस्त्र बॅलन्समध्ये
फ्रान्सचा हा निर्णय जागतिक अण्वस्त्र बॅलन्समध्ये एक नवा टप्पा आहे. रशियाच्या धमक्यांना उत्तर देताना आणि अमेरिकेवर अवलंबून न राहता, फ्रान्सने आपली स्वतंत्र आण्विक भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. यामुळे युरोपात नव्या संरक्षण समीकरणांची सुरुवात झाली असून, फ्रान्सने आक्रमक पण ठाम पवित्रा घेतला आहे. एक जागरूक आण्विक शक्ती म्हणून स्वतःची ओळख अधिक बळकट करण्याच्या दिशेने.