Operation Sindhu : इराण आणि इस्रायल यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत असताना, भारताने आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मोठे पाऊल उचलले आहे. वाढत्या युद्धपरिस्थितीत भारत सरकारने ‘ऑपरेशन सिंधू’ सुरू करत इराणमधील अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष बाब म्हणजे, इस्रायलशी संघर्षाच्या काळातसुद्धा इराणने भारतासाठी आपले बंद हवाई क्षेत्र तात्पुरते खुले केले आहे, ज्यामुळे भारतीयांना सुरक्षित मार्ग उपलब्ध झाला आहे.
विशेष उड्डाणांद्वारे भारतीयांची सुटका
ऑपरेशन सिंधू अंतर्गत, इराणमधील किमान १००० भारतीय विद्यार्थी पुढील दोन दिवसांत भारतात दाखल होणार आहेत. यातील पहिले विमान शुक्रवार, २० जून २०२५ रोजी रात्री ११ वाजता नवी दिल्लीला पोहोचणार आहे. त्यानंतर दुसरे विमान शनिवारी सकाळी, तर तिसरे शनिवारी संध्याकाळी आगमन करणार आहे. यामुळे इराणमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचेही प्रचंड प्रमाणात मानसिक समाधान होणार आहे.
भारताचा मोठा राजनैतिक विजय
या संकटकाळात इराणने फक्त भारतासाठी हवाई मार्ग खुले केल्यामुळे भारताचा राजनैतिक दृष्टिकोनातून मोठा विजय मानला जात आहे. इस्रायल-इराण दरम्यान सुरू असलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमुळे बहुतेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद आहेत. मात्र, भारतासाठी विशेष मान्यता देण्यात आली असून, एक विशेष कॉरिडॉर (हवाई मार्ग) उघडण्यात आला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel- Iran War: इराण इस्त्रायल युद्ध पार्श्ववभूमीवर ‘हा’ अनोख्या मिसाइलचा VIDEO सोशल मीडियावर का होतोय इतका VIRAL??
विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी दूतावासांचे समन्वय
दिल्लीतील इराणी दूतावास आणि तेहरानमधील भारतीय मिशन यांच्यातील सातत्यपूर्ण संपर्कामुळेच ही कारवाई शक्य झाली. काही भारतीय विद्यार्थी युद्धजन्य परिस्थितीत जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे इराणी परराष्ट्र मंत्रालयाने स्वतः पुढाकार घेत भारतीय दूतावासाशी तातडीने संपर्क साधला.
या पूर्वसंधीला, १८ जून रोजी भारत सरकारने ऑपरेशन सिंधूची अधिकृत घोषणा केली होती, जेव्हा समजले की इराणमधील परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. विशेष म्हणजे, १७ जूनला उत्तर इराणमधून ११० भारतीय विद्यार्थ्यांना रस्त्याने आर्मेनियातील येरेवन येथे हलवण्यात आले होते. येथून विशेष विमानाने १९ जून रोजी हे विद्यार्थी भारतात दाखल झाले.
इराणमध्ये ४,००० हून अधिक भारतीय
सध्या इराणमध्ये सुमारे ४,००० भारतीय नागरिक वास्तव्यास आहेत. यामध्ये सुमारे ५०% नागरिक विद्यार्थी आहेत. यापैकी अनेकजण शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी तेहरान, मशहद, इस्फहान यांसारख्या शहरांमध्ये राहत आहेत. भारत सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाने त्यांच्याशी संपर्क ठेवत त्यांना सुरक्षितरित्या मायदेशी आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : आता तैवानची बारी? चीनने सीमा ओलांडली आणि 61 फायटर जेट रवाना, ब्रिटनच्या हालचालीमुळे ड्रॅगन संतप्त
भारताची जागरूकता आणि समन्वयाचे यश
इराण-इस्रायल संघर्षामुळे संपूर्ण पश्चिम आशियात अस्थिरता निर्माण झाली असली, तरी भारताने वेळेत हस्तक्षेप करून आपल्या नागरिकांची काळजी घेतली आहे. ऑपरेशन सिंधू हा भारताच्या जागरूक, तत्पर आणि माणुसकीवर आधारित परराष्ट्र धोरणाचा उत्तम नमुना ठरतो. राजनैतिक, सामरिक आणि मानवीदृष्टिकोनातून ही कारवाई देशासाठी एक सकारात्मक उदाहरण ठरली आहे. यामुळे इराणमध्ये अडकलेल्या हजारो भारतीय नागरिकांना नवा श्वास मिळाला असून, भारत सरकारच्या कार्यपद्धतीचे कौतुक देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही होत आहे.