Israel–Hezbollah War: इस्त्रायलच्या भेदक हल्ल्यांमुळे हिजबुल्लाह प्रमुख खवळले; म्हणाले, हे तर...
राजधानी: इस्रायलच्या सुरक्षा यंत्रणांनी लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांना लक्ष्य केले आहे. इस्त्रायली संरक्षण दलांनी लेबनॉनमधील अनेक शहरांवर रॉकेट हल्ले सुरू केले आहेत. हिजबुल्लाह प्रमुख नसरल्लाह पेजर आणि वॉकीटॉकी हल्ल्यांचा निषेध करत असताना हा हल्ला झाला. हिजबुल्लाहच्या सैनिकांनी लेबनॉन सीमेवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन इस्रायली सैनिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर इस्त्रायलने रॉकेट डागत प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान हिजबुल्लाहचे प्रमुख भाषण करत असतानाच इस्त्रायलने जोरदार हल्ला केला आहे.
लेबनॉनमधील पेजर आणि रेडिओ हल्ल्यानंतर हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्लाह यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हिजबुल्लाह प्रमुख म्हणाले, इस्त्रायलने लेबनॉनमध्ये ज्या प्रकारे नरसंहार केला आहे. हे तर एक प्रकारे युद्धाचे आवाहन दिल्यासारखे आहे. नागरिकांना लक्ष्य करून इस्त्रायलने मर्यादा ओलांडली आहे. लेबनॉनमधून ४ हजारांपेक्षा जास्त पेजर्स वापरले जात असल्याचे इस्त्रायलला माहिती होते. याचा फायदा उचलत इस्त्रायलने एकाच वेळेस ४ हजार लोकांना ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. याचा फटका हजारो नागरिकांना देखील बसला आहे.
IDF ने एक्स’ वरील एका पोस्टमध्ये म्हटले, ”आयडीएफ सध्या हिजबुल्लाहच्या दहशतवादी क्षमता आणि पायाभूत सुविधांना कमकुवत करण्यासाठी लेबनॉनमधील हिजबुल्लाह लक्ष्यांवर हल्ला करत आहे. अनेक दशकांपासून, हिजबुल्लाहने नागरी घरांना शस्त्र बनवले आहे. त्यांच्या खाली बोगदे खोदले आहेत आणि नागरिकांचा मानवी ढाल म्हणून वापर केला जात आहे.”
आज हिजबुल्लाहचे प्रमुख पेजर हल्ल्यावरून भाषण करत असतानाच इस्त्रायलच्या सुरक्षा यंत्रणांनी बेरूतमध्ये भीषण रॉकेट हल्ले केले. आम्ही गाझाला पाठिंबा देणे थांबवणार नाही, असे हिजबुल्लाहचे प्रमुख म्हणाले आहेत. कोणत्याही परिणामांचा विचार न करता लेबनॉन गाझाला मदत करत राहील. आम्ही इस्रायलसमोर गुडघे टेकणार नाही. हिजबुल्लाह आणि इस्त्रायल हे दोन्ही देश ऐकायला तयार नसल्याने या युद्धाची भीषणता कुठपर्यंत जात हे पाहावे लागणार आहे.