Israel-hezbollah War: हिजबुल्लाहच्या कमांडर सलीम इस्त्रायलच्या हवाई हल्ल्यात ठार; इराणचा तीव्र निषेध
सीरीया: इस्त्रायलने सीरियात मोठा हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यांमध्ये हिजबुल्लाहचा कमांडर सलीमची हत्या केल्याचे इस्त्रायली लष्कराने म्हटले आहे. इस्त्रायली लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, सलीम सीरीयातील हिजबुल्लाहच्या उल-कुसेर भागात लपला होता. इस्त्रायलला याची माहिती मिळताच इस्त्रायलने सीरियावर हल्ला करून त्याचा खात्मा केला आहे.
अमेरिकेने सलीमवर 10 मिलियन डॉलर्सचे बक्षिस ठेवले होते
याशिवाय, या हलल्यात सलीमसह आणखी 8 जणांचा मृत्यु झाला असल्याचे सांगितले जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हिजबुल्लाहच्या गुप्त युनिट 151 चा सदस्य असलेल्या सलीमवर 10 मिलियन डॉसर्सचे अमेरिकेने बक्षिस ठेवले होते. यामागचे कारण त्याने 2005 मध्ये लेबनॉनच्या तात्कालीन पंतप्रधान रफिक हरीरी यांच्या हत्येला जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 14 फेब्रुवारी 2005 रोजी हरीरी यांच्या ताफ्यावर बेरूतमध्ये स्फोटकांनी भरलेल्या ट्रकने आत्मघाती हल्ला केला होता. या हल्ल्यांमध्ये पंतप्रधान रफिक हरीरी आणि 21 अन्य व्यक्तींचा मृत्यू झाला. या हत्येच्या चौकशीसाठी नेदरलँड्समधील हेग येथे संयुक्त राष्ट्रांनी एक विशेष न्यायाधिकरण स्थापन केले होते.
हिजबुल्लाहने सलीमला सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष काळजी घेतली
मिळालेल्या माहितीनुसार, 2022 मध्ये न्यायाधिकरणाने सलीम आणि त्याच्या साथीदारांना हरीरी यांच्या हत्येसाठी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तथापि, हिजबुल्लाहच्या नेत्यांनी या आरोपींना न्यायालयात हजर करण्यास नकार दिला होता. त्यानंतर सलीमला सुरक्षित ठेवण्यासाठी हिजबुल्लाने विशेष काळजी घेतली होती, पण इस्त्रायली गुप्तचर संस्था मोसादने त्याचा ठावठिकाणा शोधून हवाई हल्ल्याच्या माध्यमातून त्याची हत्या केली.
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला
या घटनेनंतर इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. इराणने इस्रायलला संयुक्त राष्ट्रांतून हकालपट्टी करण्याची मागणी केली. हरीरी यांच्या हत्येनंतर लेबनॉन आणि सीरियाचे संबंध ताणले गेले होते. लेबनॉनच्या अंतर्गत नेत्यांनी सीरियावर देशातून माघार घेण्याचा दबाव आणला होता. यामुळे सीरियाने 2005 मध्ये लेबनॉनमधून सैन्य माघारी घेतले आणि 29 वर्षांचा ताबा संपवला. इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी हिजबुल्लाला पराभूत करणे ही मोठी उपलब्धी असल्याचे सांगितले. त्यांनी लेबनॉन इस्रायलशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करेल, अशी आशा व्यक्त केली.
इस्त्रायने घेतली पेजर हल्ल्यांची जबाबदारी
दोन महिन्यांपूर्वी 17 सप्टेंबर रोजी लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहवर पेजर हल्ले करण्यात आले होते. त्यानंतर हे हल्ले कोणी केले याबाबत तपास सुरू होता. मात्र कोणतीही माहिती समोर आली नाही. दरम्यान आता इस्त्रायलने या हल्ल्यांची जबाबदारी घेतली आहे. इस्त्रायने स्पष्ट केले आहे की, 17 सप्टेंबर रोजी लेबनॉनमधील हिजबुल्ला सदस्यांच्या पेजरमध्ये झालेले स्फोट केले होते. या स्फोटांची जबाबदारी तब्बल 54 दिवसांनी इस्त्रायने स्वीकारली आहे.