Israel-Iran Tension Iran hits back with 100+ explosive drones ballistic missiles ready
Iran Drone Attack On Israel : मध्यपूर्व पुन्हा एकदा युद्धाच्या उंबरठ्यावर उभं आहे. इस्रायलने इराणच्या अणु केंद्रांवर आणि वैज्ञानिकांवर “पूर्व-प्रेरणादायक” (pre-emptive) हल्ला केल्यानंतर, इराणने आता प्रत्युत्तरादाखल मोठा हवाई हल्ला केला आहे. इराणने १०० हून अधिक सशस्त्र ड्रोन इस्रायलकडे सोडले असून, लवकरच बॅलिस्टिक क्षेपणास्त्रेही डागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इराणी माध्यमांनुसार, या कारवाईला “सिंहाच्या शेपटावर पाय देण्यासारखे” म्हटले गेले आहे. इराणने आपल्या निवेदनात सांगितले की, इस्रायलच्या अणु हल्ल्यांमुळे जगाला आता इराणच्या अणु समृद्धीकरण, क्षेपणास्त्र तंत्रज्ञान आणि स्वावलंबनाचे खरे स्वरूप समजेल.
अलीकडेच इस्रायलने ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ अंतर्गत इराणच्या अणु संशोधन केंद्रांवर आणि वैज्ञानिकांवर हल्ले केले होते. याच हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने हा व्यापक ड्रोन हल्ला केला आहे. इस्रायली संरक्षण दल (IDF) चे प्रवक्ते एफी डेफ्रिन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, इराणने अलिकडच्या काही तासांमध्ये १०० हून अधिक ड्रोन इस्रायलच्या दिशेने सोडले आहेत. हे ड्रोन लक्ष्यस्थळी पोहोचण्यासाठी काही तास लागतील, अशी शक्यता आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘लग्न न करण्याचा ट्रेंड’ वाढतोय! जपान आणि स्वीडनमध्ये सर्वाधिक अविवाहित मुली; कारण ऐकून व्हाल थक्क
हा हल्ला एकट्या इराणकडून नव्हे, तर संभाव्यपणे बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसह मोठ्या सैनिकी कारवाईचे प्रारंभिक संकेत आहेत. इस्रायलच्या हवाई संरक्षण प्रणालीला वेळ मिळू नये, म्हणूनच इराणने प्रथम ड्रोन सोडल्याचे संरक्षण विश्लेषकांचे म्हणणे आहे. यानंतर होणाऱ्या क्षेपणास्त्र हल्ल्यात अधिक नुकसान व्हावे, हाच उद्देश असावा. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये देखील इराणने इस्रायलवर हल्ला केला होता. त्यावेळी अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स यांसह काही मित्र राष्ट्रांनी इस्रायलच्या मदतीसाठी युती केली होती. परंतु या वेळी इस्रायल एकटा आहे की नाही हे स्पष्ट नाही.
हल्ल्यानंतर इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी निवेदन देताना म्हटले की, “इस्रायलच्या अस्तित्वाला धोका असेपर्यंत इराणवर हल्ले सुरूच राहतील.” त्याचवेळी, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी इशारा दिला आहे की, “इस्रायलने स्वतःसाठी कटू नशिब लिहिलं आहे. या हल्ल्याला जबर शिक्षा मिळेल.” इराणी सरकारी टीव्हीवरून दिलेल्या निवेदनात त्यांनी सांगितले की, “इस्रायलने पुन्हा एकदा आपल्या रक्ताळलेल्या आणि द्वेषपूर्ण स्वभावाचं दर्शन जगाला घडवलं आहे.”
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी सांगितले की, “इस्रायलचे अणु हल्ले अमेरिकेच्या मंजुरीशिवाय किंवा समन्वयाशिवाय होणं शक्य नव्हतं.” त्यांनी थेट आरोप केला की, या सगळ्या बेपर्वा आणि धोकादायक कारवाईमागे अमेरिका आहे आणि याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel Iran War News Live : मध्य पूर्वेतील संघर्ष पेटला! इस्रायलच्या ‘Operation Rising Lion’ नंतर इराण आक्रमक, हवाई क्षेत्र बंद
सध्या इस्रायल आणि इराणमध्ये थेट संघर्ष सुरू असून, पुढील काही तासांमध्ये हे युद्ध अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ले, ड्रोनचा मारा आणि आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया यामुळे मध्यपूर्वेतील अस्थिरता अधिकच वाढणार आहे. या संघर्षात अमेरिका, युरोपीय राष्ट्रे आणि अन्य प्रमुख शक्ती कोणती भूमिका घेतील याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. हा संघर्ष केवळ दोन देशांपुरता मर्यादित राहील की पूर्ण प्रदेशाला वेढून टाकेल, हे लवकरच स्पष्ट होईल.