
Iran-US War : पुन्हा युद्धाचा भडका ! अमेरिकेचा इराणवर मोठा हल्ला; तेहरानसह अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
तेहरान : गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक घडामोडी घडत आहेत. अमेरिका आणि इस्त्रायल या दोन्ही देशांकडून इराणवर हल्ले केले जात आहेत. इराणकडूनही याला चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. असे असताना आता अमेरिकेच्या लष्कराने बुधवारी रात्री इराणच्या अनेक शहरांना लक्ष्य करत मोठे हल्ले केले आहेत.
अमेरिकेने केलेल्या या हल्ल्यानंतर इराणच्या विविध शहरांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या शहरांत मोठ्या स्फोटांचे आवाजही ऐकू आले, ज्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इराणच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई केली जात आहे. दरम्यान, इराणचे लष्कर आयआरजीसीने, अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून या प्रदेशातील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला केल्याचा दावा केला आहे. मात्र, आयआरजीसीने तपशील दिलेला नाही. या हल्ल्यानंतर बहरीनमध्ये सायरनचा आवाज ऐकू आला.
इराणच्या ड्रोनने अमेरिकेच्या हेलिकॉप्टरला लक्ष्य केल्यानंतर परिस्थिती आणखी बिघडली. यापूर्वी, इराणने अमेरिकेच्या लष्करी हेलिकॉप्टरला लक्ष्य करून ते नष्ट केले होते, ज्यामुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकेच्या लष्कराला प्रत्युत्तर देण्याचे निर्देश दिले. मात्र, पेंटागॉनने स्पष्ट केले की ही कारवाई केवळ प्रतिशोधात्मक उपाय नसून, भविष्यातील कोणत्याही कराराच्या किंवा समझोत्याच्या अटी निश्चित करण्याच्या उद्देशानेही होती.
तेहरानसह अनेक शहरांत स्फोटांचे आवाज
अमेरिकेने इराणवर मोठा हल्ला केला. त्यात तेहरानसह अनेक शहरांमध्ये मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकूही आले आहेत. हे हल्ले अशा वेळी झाले आहेत, जेव्हा केवळ एक दिवस आधी अमेरिकेने इराणवर केलेल्या कारवाईमुळे दोन्ही देशांमधील तणाव आधीच वाढला होता. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी यापूर्वीच संकेत दिले होते की, अमेरिका बुधवारी रात्री इराणवर मोठा हल्ला करेल आणि गरज पडल्यास ही कारवाई पुढेही सुरू ठेवली जाऊ शकते, असा इशारा दिला होता. त्यानंतर आता हा हल्ला झाल्याचे पाहिला मिळत आहे.