Markets plunge due to Trump's tariffs; Fears of a major slowdown in global trade
1987 मध्ये ज्याप्रमाणे काळा सोमवार पहायला मिळाला होता तशाच काळा सोमवारचा इशारा समीक्षक जीम क्रॅमर यांनी दिला होता. त्यावेळी डाऊ जोन्स २२.६ टक्क्यांनी घसरला होता. तथापि सोमवार ७ एप्रिल रोजी टोकियो ते लंडन आणि न्यूयॉर्क ते मुंबई पर्यंतचे शेअर बाजार ज्याप्रकारे कोसळले ते भयावह होते. सेन्सेक्स आणि निफ्टी ३ टक्क्यांनी घसरले, परंतु हँगसेग १३.२ टक्के आणि निक्केईने त्यांचे बाजार भांडवल ८ टक्के गमावले. युरोपीयन स्टॉक आणि अमेरिकन फ्यूचर्सचीही वाईट अवस्था झाली.
२ एप्रिल रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे टॅरिफ औषध दिले आणि तेव्हापासून शेअर बाजारात सुधारणा होण्याऐवजी तो अधिकच घसरू लागला आहे. असे असूनही ट्रम्प आणखी कडू औषध देण्याचा आग्रह धरीत आहे. जर चीनने सर्व अमेरिकन आयातीवरील ३४ टक्के प्रत्युत्तर शुल्क मागे घेतले नाही तर, त्यावर ५० टक्के अतिरिक्त कर लादण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे.
ट्रम्प यांना पाठिंबा देणारे अब्जाधीश देखील चिंताग्रस्त आणि अस्वस्थ झालेले आहेत, म्हणून ते आता मागा टॅरिफ ट्रेनमधून उड्या मारत आहेत. सोन्याच्या कमतही घसरत आहेत, त्यावरून असे दिसून येते की, गुंतवणूकदार इतर गुंतवणुकीतील तोटा भरून काढण्यासाठी ही सुरक्षित मालमत्ता देखील विकत आहेत. सोमवारी भारतातील सोन्याच्या किमती १९०० रूपयांनी घसरल्या आणि सेन्सेक्स २२२७ अंकांनी घसरला, जो २४ फेब्रुवारी २०२२ रोजी २७०२ अंकांनी घसरला, तेव्हापासून सर्वाधिक आहे. हकीम ट्रम्पचा उपाय काम करीत नाही हे स्पष्ट आहे. या व्यापक युद्धामुळे आता चीनप्रमाणेच युरोपियन युनियन देखील प्रत्युत्तरात्मक शुल्क लादणार आहे.
भारताने टैरिफ वॉरमध्ये वेगळी भूमिका स्वीकारली आहे. व्यापार युद्धासाठी कमी किमतीच्या उत्पादन आणि स्वस्त वस्तूवर आधारित चीनच्या व्यापार धोरणाला वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी जबाबदार धरले आहे. दरम्यान, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रूबियो यांच्याशी चर्चा केली आणि द्विपक्षीय व्यापार करार लवकरच पूर्ण करण्याचे महत्व अधोरेखित केले आहे.
भारताने अमेरिकेवर प्रत्युत्तरात्मक शुल्क लादले नाही तर त्याऐवजी त्यांच्यासोबत व्यापार कराराचा पर्याय निवडला. दरांमुळे निर्माण झालेली अनिश्चितता बाजारपेठांना मोठ्या प्रमाणात हानी पोहचवत आहे. मागणी आणि वाढीचे काय होईल ही प्रवृती किती काळ टिकेल हे कोणालाही माहिती नाही. अमेरिकेतील शेअर बाजारही घसरत आहेत, त्यामुळे ट्रम्प समर्थक आणि अब्जाधीश गुंतवणूकदार बिल ॲकमन देखील चिंतेत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- नेतन्याहू यांना अटकेची भिती? 400 किमी प्रवास करुन पोहोचले अमेरिकेत
जेव्हा बाजार घसरतो तेव्हा ते बहुधा अमेरिकेत मंदीला कारणीभूत ठरते आणि गोल्डमन सॅक्स आणि जेपी मार्गव या दोन्ही गुंतवणूक बँकांनी काही दिवसपूर्वी त्यांच्या मंदीच्या अंदाजामध्ये सुधारणा केली आहे. गोल्डन सॅक्सने अमेरिकेत मंदीची ३५ टक्के शक्यता वर्तविली आहे आणि त्याचा मोठा प्रतिस्पर्धी जेपी मॉर्गनने या वर्षी जागतिक मंदीची ६० टक्के शक्यता वर्तविली आहे. जेपी मॉर्गनचे सीईओ जेपी डायमन यांनी इशारा दिला की, मंदी नसली तरी टॅरिफमुळे वाढ मंदावेल.
बहुतेक देश व्यापार करार करतील आणि काही महिन्यातच शुल्कचा प्रभाव कमी होईल, अशी अपेक्षा आहे. व्हाईट हाऊसचा असा दावा आहे की, आतापर्यंत ५० पेक्षा अधिक देशांनी त्यांच्यासोबत संपर्क साधला आहे. पण चीन मात्र झुकायला तयार नाही. चीनी सुटे भागाशिवाय कोणतेही जटिल उत्पादन बनविणे अशक्य आहे, त्यामुळे अमेरिका आणि चीनी शुल्काचा त्रास जगभर जाणवेल. म्हणूनच भारताने अनिश्चिततेचा अंत करण्यासाठी त्वरित मैत्रीपूर्ण व्यापार करार केले पाहिजे, परंतु हे शेतक-यांसारख्या असुरक्षित घटकांना लक्षात ठेवूनच केले पाहिजे.