
पाकिस्तानच्या कराचीत सिलेंडरचा भीषण स्फोट; मोठ्या स्फोटानंतर तीन मजली इमारतच कोसळली
इस्लामाबाद : पाकिस्तानमधील कराची येथे एक मोठी दुर्घटना घडली. सिलेंडरच्या स्फोटात एक निवासी इमारत कोसळली. या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. स्थानिक माध्यमांनी पोलिस आणि स्थानिक बचाव पथकांचा हवाला देत ही माहिती दिली. कराचीच्या सोल्जर बाजारातील गुल राणा कॉलनी परिसरातील एका घरात ही दुर्घटना घडली.
सोल्जर बाजार परिसरात झालेल्या स्फोटात तीन मजली निवासी इमारतीचा काही भाग कोसळला. महिला आणि मुलांसह 16 जणांचा मृत्यू झाला आणि 14 जण जखमी झाले आहेत. हा स्फोट गॅस गळतीतून निघालेल्या ठिणगीमुळे झाला. सोल्जर बाजारातील गुल राणा कॉलनी परिसरातील एका निवासस्थानी ही घटना घडली. जखमी आणि मृतांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. मृतांमध्ये चार मुले आणि तीन महिलांचा समावेश आहे. घटनास्थळी असलेल्या बचाव कर्मचाऱ्यांनी सांगितले की, रात्री पहिल्या मजल्यावर स्फोट झाला, ज्यामुळे इमारतीचा एक भाग कोसळला.
हेदेखील वाचा : कोल्हापूरच्या गारगोटी-कडगाव रस्त्यावर ‘बर्निंग कार’चा थरार; आगीत कार जळून खाक
दरम्यान, पोलिस आणि बचाव पथके आता शोध मोहीम राबविण्यासाठी सर्व उपलब्ध साधनांचा वापर करत आहेत. डॉनच्या वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितले की प्राथमिक माहितीनुसार हा स्फोट गॅस गळतीमुळे झाला असावा, कदाचित सिलेंडर किंवा गॅस सक्शन मशीनमधून गळती होऊन ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
जुलै 2025 मध्येही घडली होती दुर्घटना
पाकिस्तानच्या कराचीत मोठा स्फोट झाला. जुलै २०२५ मध्ये कराचीच्या लियारी भागात पाच मजली इमारत कोसळल्याने किमान २७ लोक मृत्युमुखी झाले आणि १० जण जखमी झाले होते. जीर्ण झालेल्या संरचनेमुळे अधिकाऱ्यांनी पाच मजली इमारत आधीच असुरक्षित घोषित केली होती. त्यानंतर ही इमारत कोसळून दुर्घटना घडली.
हेदेखील वाचा : Blast News: हॉटेल जगदंबामध्ये सिलेंडरचा स्फोट अन्…; 5 जखमी कामगारांचा उपचारांदरम्यान मृत्यू