mohammad yunus asks china for 50 year river management plan for bangladesh
बीजिंग: बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी चीनकडे देशातील नद्यांच्या व्यवस्थापनासाठी 50 वर्षांचा मास्टरप्लॅन मागवला आहे. हा प्रस्ताव भारतासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो, कारण चीन तिबेटमधील यारलुंग झांगबो (ब्रह्मपुत्रा) नदीवर मोठे जलविद्युत धरण बांधण्याच्या तयारीत आहे. यामुळे भारताच्या जलसुरक्षेसह पर्यावरण व्यवस्थेवरही परिणाम होऊ शकतो.
बांगलादेश हा एक डेल्टा प्रदेश असल्यानं वारंवार पुरांच्या समस्येला तोंड द्यावा लागतो. लोकसंख्येच्या वाढीमुळे जल व्यवस्थापन हा मोठा प्रश्न ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर, मोहम्मद युनूस यांनी चीनकडे मदत मागितली. त्यांनी बीजिंग दौऱ्यात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली आणि चीनच्या जल व्यवस्थापन पद्धतींचे कौतुक केले. चीनने बांगलादेशला जल व्यवस्थापनाबाबत तांत्रिक मदत आणि मास्टरप्लॅन देण्याचे मान्य केले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अमेरिकेत उड्डाणानंतर विमान अनियंत्रित होऊन घरावर आदळले अन्… पाहा VIDEO
चीनने यारलुंग झांगबो नदीच्या खालील भागात 137 अब्ज डॉलर्सच्या जलविद्युत धरण प्रकल्पास मंजुरी दिली आहे. हा जगातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प मानला जातो आणि यामुळे भारतातील ब्रह्मपुत्रा नदीच्या प्रवाहावर मोठा परिणाम होऊ शकतो. चीनच्या या उपक्रमामुळे अरुणाचल प्रदेश आणि आसाममध्ये जलविद्युत प्रकल्प उभारण्याच्या भारताच्या योजनांवरही प्रभाव पडू शकतो.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केले की, “नद्यांच्या प्रवाहावर आमचे ठोस अधिकार आहेत आणि आम्ही चीनकडे वारंवार आमच्या चिंता व्यक्त केल्या आहेत.” परंतु बांगलादेश आता चीनच्या मदतीने नदी व्यवस्थापनाचा मास्टरप्लॅन स्वीकारत असल्याने भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसमोर एक नवा धोका उभा राहिला आहे.
बांगलादेश आणि चीन यांच्यातील वाढत्या सहकार्यामुळे भारतासाठी आणखी एक आव्हान निर्माण झाले आहे. मोहम्मद युनूस यांनी चीनला सांगितले की, “भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांना जलस्रोतांचे व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे.” मात्र, त्यांनी चीनच्या मदतीने बांगलादेशसाठी स्वतंत्र मास्टरप्लॅन मागवला असल्याने भारत-बांगलादेश संबंधांवर याचा दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : मॉस्को हादरलं! रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या ताफ्यावर हल्ला; हत्येचा कट की अपघात?
बांगलादेशचा हा निर्णय केवळ पर्यावरणपूरक धोरण म्हणून पाहता येणार नाही. त्याचा भारताच्या जलसुरक्षा आणि भू-राजकीय धोरणांवर मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. चीन आणि बांगलादेश यांच्यातील वाढती जवळीक आणि चीनच्या जलविद्युत प्रकल्पामुळे भारताच्या पूर्वेकडील राज्यांतील जलप्रवाह आणि पर्यावरण यावर परिणाम होईल. अशा स्थितीत, भारताने या नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रभावी धोरण आखण्याची गरज आहे.