श्रीलंका राष्ट्रपती दिसानायके भारताला 'असे' काय म्हणाले यामुळे उडाली ड्रॅगनची झोप? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
नवी दिल्ली: श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांनी सोमवारी (16 डिसेंबरला ) भारताला भेट दिली. यादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे भेट घेतली. राष्ट्रपती पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर दिसानायके यांचा हा पहिला परदेश दौरा होता. मोदींशी भेटीदरम्यान दिसानायके यांनी द्वीप राष्ट्राचा भाग भारताच्या विरोधात वापरला जाणार नाही असे आश्वासन दिले. त्यांनी श्रीलंकेवर चीन आणि भारतामधील तणावाच्या पार्श्वभूमीवर हे विधान केले.
दोन्ही देशांच्या सुरक्षेसाठी सहकार्य करार
चीनच्या श्रीलंकेतील वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर हे आश्वासन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. श्रीलंका आर्थिक सुधारणा करत असताना, भारताकडून सातत्याने मदत मिळत आहे. मोदी यांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वीच्या आर्थिक संकटाच्या वेळी भारताने श्रीलंकेला 4 अब्ज डॉलर्सची आर्थिक मदत केली होती. या दौऱ्यादरम्यान दोन्ही नेत्यांनी सुरक्षा सहकार्य करार अंतिम करण्याचे आणि आर्थिक सहकार्य अधिक मजबूत करण्याचे ठरवले.
संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रात सहकार्याचा विस्तार
मिळालेलल्या माहितीनुसार, दिसानायके आणि नरेंद्र मोदी यांनी संरक्षण क्षेत्रात सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने लवकरच संरक्षण करारावर स्वाक्षरी करण्याचे ठरवले. त्याचप्रमाणे, वीज ग्रीड कनेक्टिव्हिटी आणि बहुउत्पाद पेट्रोलियम पाईपलाइन यासारख्या प्रकल्पांद्वारे ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावरही सहमती झाली. या प्रकल्पांमुळे दोन्ही देशांमधील आर्थिक संबंधांना आणखी बळकटी मिळेल.
तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत-श्रीलंका भागीदारीला “फ्युचरिस्टिक व्हिजन” म्हणून संबोधले. राष्ट्रपती दिसानायक यांनी भारताच्या प्रादेशिक अखंडतेसाठी श्रीलंकेचा नेहमीच पाठिंबा राहील, असे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले, “आमची जमीन भारताच्या हिताविरोधी कोणत्याही कारवायांसाठी वापरली जाणार नाही, याची मी हमी देतो.”
रामेश्वरम-तलाईमन्नार दरम्यान नौका सेवा लवकरच सुरू
दोन देशांमधील संपर्क सुधारण्यासाठी रामेश्वरम-तलाईमन्नार दरम्यान लवकरच नौका सेवा सुरू केली जाईल, अशी घोषणा मोदींनी केली. नागपत्तनम-कांकेसंथुराई दरम्यान सुरू झालेल्या यशस्वी नौका सेवेच्या पुढे ही नवी सेवा सुरू होईल.पंतप्रधान मोदी यांनी श्रीलंकेत तमिळ समुदायाच्या आकांक्षांच्या पूर्ततेचा मुद्दा अधोरेखित केला. श्रीलंकेच्या सरकारने तमिळ लोकांच्या गरजा आणि आकांक्षा पूर्ण कराव्यात, असे मोदी म्हणाले.
अर्थमंत्री आणि परराष्ट्र मंत्र्यांची भेट
दिसानायके यांनी आपल्या दौऱ्यादरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामण, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल यांच्याशीही भेट घेतली. या भेटीदरम्यान मच्छीमारांशी संबंधित समस्या, द्विपक्षीय सहकार्य आणि सुलह प्रक्रियेवरही विस्तृत चर्चा झाली. भारत आणि श्रीलंकेतील या मजबूत सहकार्यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांना नवा आयाम मिळणार आहे.