नवी दिल्ली – फिलिपिन्समध्ये कांद्याचे दर (Philippines Onion Price ) गगनाला भिडले आहेत. तिथे कांद्याचे दर चिकनपेक्षा तिप्पट झाले आहेत. फिलिपिन्स कृषी विभागानुसार 1 किलो चिकनचा ( Expensive Than Chicken ) दर 325 रुपये आहे, तर 1 किलो कांदा 900 रुपयांना मिळत आहे. वाढते दर आणि मागणीमुळे इथे कांद्याची (Onion Price) तस्करीही सुरू झाली आहे.
सीएनएनच्या वृत्तानुसार दोन दिवसांपूर्वी कस्टमच्या अधिकाऱ्यांनी 3 कोटी रुपयांचा कांदा जप्त केला होता. तो चीनमधून पेस्ट्रीच्या डब्यांत लपवून आणला जात होता. यापूर्वी डिसेंबरमध्ये कस्टम अधिकाऱ्यांनी 2.5 कोटींचा कांदा जप्त केला होता. तो एका क्लोथिंग शिपमेन्टमध्ये लपवून आणला जात होता.
-21 हजार मेट्रिक टन कांदा आयातीच्या निर्णयाला मंजुरी
फिलिपिन्सचे राष्ट्रपती फर्डिनान्ड मार्कोस ज्युनियर म्हणाले की, ते जप्त केलेला कांदा कसा विकावा याचा विचार करत आहेत. जेणेकरून कांदा टंचाई दूर करता येईल. राष्ट्रपती मार्कोस यांनी याच आठवड्यात 21 हजार मेट्रिक टन कांदा आयातीच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. मात्र हा कांदा 27 जानेवारीपर्यंत फिलिपिन्समध्ये येईल. तर फिलिपिन्समधील कांद्याची फेब्रुवारीत काढणीला सुरुवात होईल. यानंतर कांद्याचे दर कमी होण्याची आशा आहे.
– दर महिन्याला 20 हजार मेट्रिक टन कांदा खाल्ला जातो
कांदा हा फिलिपिन्समधील नागरिकांच्या आहारातील महत्वाचा पदार्थ आहे. इथे दर महिन्याला 20 हजार मेट्रिक टन कांदा खाल्ला जातो. गेल्या वर्षीच्या सुपर वादळामुळे इथली कांद्याची शेती उध्वस्त झाली होती. कांद्याचे दर वाढल्याने इथे महागाईही 14 वर्षांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे.