Pakistan admits requesting ceasefire after Operation Sindoor Saudi mediated
Pakistan ceasefire request : भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेनंतर पाकिस्तानकडून एक महत्त्वाची आणि लाजिरवाणी कबुली समोर आली आहे. पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी स्पष्ट केले आहे की, भारताच्या हवाई हल्ल्यांनंतर त्यांनी युद्धबंदीसाठी थेट भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी संपर्क करण्यासाठी सौदी अरेबियाकडे विनंती केली होती. या घडामोडीमुळे दोन्ही देशांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाची मध्यस्थी महत्त्वाची ठरली होती, हे प्रथमच स्पष्ट झाले आहे.
२२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने कठोर पवित्रा घेत ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आणि पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळांवर अचूक हवाई हल्ले केले. या कारवाईत १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. यामुळे पाकिस्तानची मोठी अडचण झाली आणि त्यांनी प्रतिहल्ल्याची तयारी सुरू केली. मात्र, भारताने दुसऱ्यांदा नूर खान आणि शोरकोट या महत्त्वाच्या हवाई तळांवर हल्ला केल्याने पाकिस्तानला मोठा धक्का बसला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : युद्धाचा नवा टप्पा सुरू! इराणचा इस्रायलवर बॅलिस्टिक हल्ला; बेअरशेबातील मायक्रोसॉफ्ट ऑफिसजवळ स्फोट
इशाक दार यांनी एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, हल्ल्यांनंतर सौदी अरेबियाचे राजकुमार फैसल यांनी त्यांना संपर्क साधून विचारले, “मी एस. जयशंकर यांच्याशी युद्धबंदीसाठी बोलू का?” दार यांनी त्यास सहमती दिली. काही वेळातच राजकुमार फैसल यांनी पुन्हा फोन करून कळवले की, जयशंकर यांना परिस्थितीची कल्पना दिली असून, जर पाकिस्तान थांबले, तर भारतही थांबण्यास तयार आहे. यानंतर दोन्ही देशांमधील तणाव हळूहळू निवळला.
पाकिस्तान आणि भारत, दोघांनीही यापूर्वी अमेरिकेची मध्यस्थी नाकारली होती, तरीही अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अनेकदा युद्धबंदी आणण्यात आपण भूमिका बजावल्याचा दावा करत होते. मात्र, पाकिस्तानकडून प्रथमच या दाव्याला पूर्णतः नकार देत सौदी अरेबियाचे नाव पुढे आले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर ट्रम्प यांचे दावे फोल ठरले आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : इराण-इस्रायल संघर्षात हुकूमशाहाची उडी! उत्तर कोरियाची तिखट प्रतिक्रिया, डोनाल्ड ट्रम्प यांचा संयम संपला
इशाक दार यांनी ६-७ मेच्या रात्री भारताकडून झालेल्या दुसऱ्या हवाई हल्ल्याचीही कबुली दिली. त्यांनी सांगितले की, भारताने नूर खान आणि शोरकोट एअरबेसवर जोरदार हल्ला केला, त्यामुळे पाकिस्तानच्या लष्करावर मोठा मानसिक आणि भौतिक आघात झाला. या प्रसंगी, सौदी अरेबियाने त्वरित हस्तक्षेप करून परिस्थिती निवळवण्याचा प्रयत्न केला आणि दोन्ही देशांमध्ये संवादाची एक संधी निर्माण केली.
‘ऑपरेशन सिंदूर’नंतरच्या घडामोडींनी पुन्हा एकदा भारताच्या आक्रमक आणि परिणामकारक धोरणाची प्रचिती दिली आहे. पाकिस्तानकडून युद्धबंदीची विनंती झाल्याची आणि सौदी अरेबियाच्या मध्यस्थीची कबुली यामुळे भारताच्या आंतरराष्ट्रीय दबदब्याचे प्रत्यक्ष उदाहरण दिसून आले आहे. यासोबतच, पाकिस्तानमध्ये झालेल्या फोल हल्ल्यांमुळे तेथे अंतर्गत असुरक्षिततेचे आणि राजकीय अस्थैर्याचे चित्र अधिकच गडद होत आहे.