युद्धाचा नवा टप्पा सुरू! इराणचा इस्रायलवर बॅलिस्टिक हल्ला; बेअरशेबातील मायक्रोसॉफ्ट ऑफिसजवळ स्फोट ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Beersheba Microsoft office blast : इराण-इस्रायल संघर्षाला आठवा दिवस लागला असून, या संघर्षात आता अधिक आक्रमक आणि धोकादायक वळण दिसून येत आहे. इराणने गुरुवारी( दि. 19 जून 2025 )संध्याकाळपासून बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांचा नवा टप्पा सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये इस्रायलच्या बेअरशेबा शहरातील टेक पार्कजवळील परिसरात क्षेपणास्त्र पडल्याची घटना घडली, जेथे मायक्रोसॉफ्टचे कार्यालयही जवळ आहे.
एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, बेअरशेबा शहरातील टेक पार्क परिसरात इराणचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पडले. स्फोटानंतर मोठ्या प्रमाणात आग लागली असून मालमत्तेचे नुकसान झाले आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप उपलब्ध नाही. आयडीएफ IDF (इस्रायल डिफेन्स फोर्स) ने नागरिकांना आश्रयस्थान सोडण्यास सांगितले आहे, परंतु शहरात अजूनही हवाई हल्ल्याचे सायरन वाजत आहेत, अशी माहिती मिळत आहे. इस्रायल पोलिसांच्या माहितीनुसार, दक्षिण जिल्ह्यांतील मोकळ्या जागांवर दारूगोळा पडला, ज्यामुळे स्थानिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel Iran War : इस्रायल-इराण युद्धावर जागतिक शक्तींचा संयमाचा सल्ला; शी जिनपिंग यांनी व्लादिमीर पुतिन यांच्यात गंभीर चर्चा
इराणच्या तस्निम वृत्तसंस्थेनुसार, इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांनी म्हटले की, हा इराणचा प्रत्युत्तरात्मक लष्करी टप्पा आहे, ज्यात बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसह ड्रोन्सच्या थव्यांचा वापर करण्यात आला. हे हल्ले इस्रायलमधील लष्करी तळ, औद्योगिक स्थळे आणि लष्करी उद्योग केंद्रांवर केंद्रित होते.
कालच्या इराणी हल्ल्यात बेअरशेबातील सोरोका मेडिकल सेंटरचे नुकसान झाल्याचा आरोप इस्रायलने केला होता. मात्र, इराणच्या संयुक्त राष्ट्रांमधील प्रतिनिधी संस्थेने हा आरोप फेटाळून लावत सांगितले की, इराण आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार स्वसंरक्षण करत आहे.
इराणचे माजी परराष्ट्र मंत्री मोहम्मद जावेद जरीफ यांनी या युद्धावर भाष्य करत म्हटले की, “आता इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण ठरवेल की हे युद्ध कसे आणि कधी संपवायचे.” या वक्तव्यातून इराणच्या कठोर भूमिका आणि इराद्यांचे संकेत मिळतात.
दरम्यान, अमेरिकेच्या CNN चॅनेलने दिलेल्या माहितीनुसार, बेअरशेबामध्ये लागलेली आग विझवण्याचे काम सुरू आहे. इराणने सुरु केलेल्या बॅलिस्टिक हल्ल्यांमुळे इस्रायल आणि अमेरिका या दोघांपुढे गंभीर सुरक्षा संकट निर्माण झाले आहे.
बेअरशेबा हे शहर नेगेव वाळवंटात आहे आणि याठिकाणी इस्रायलचा महत्त्वाचा नेवाटिम एअरबेस आहे. या ठिकाणाच्या आसपास स्फोट झाल्यामुळे तणाव आणखी वाढला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘हे’ आहेत जगातील टॉप 5 सर्वात घातक ड्रोन; 50 हजार फूट उंचीवरून शत्रूला करतात नेस्तनाबूत
इराणने पुन्हा एकदा प्रत्युत्तरात्मक लष्करी कारवाई करत इस्रायलला जबरदस्त इशारा दिला आहे. बेअरशेबातील हल्ल्यामुळे युध्दाची तीव्रता वाढली असून, हा संघर्ष आणखी दीर्घकालीन आणि विनाशकारी होण्याची शक्यता आहे.
येत्या काही तासांत इस्रायलकडून जोरदार प्रतिक्रिया येण्याची शक्यता असून, युद्धाचा हा टप्पा संपूर्ण मध्य पूर्वेच्या शांततेसाठी घातक ठरू शकतो.