
Pakistan denies Iran official's claim No nuke threat to Israel
Iran Israel War : इस्रायल आणि इराणमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला असतानाच, एक खळबळजनक दावा आणि त्यावर पाकिस्तानची जोरदार प्रतिक्रिया चर्चेचा विषय बनली आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने असा दावा केला होता की, इस्रायलने इराणवर अणुहल्ला केल्यास पाकिस्तान इस्रायलवर अणुबॉम्ब टाकण्यास समर्थन देईल. मात्र, पाकिस्तानने हा दावा फेटाळत स्पष्टपणे सांगितले की, अशा प्रकारचे कोणतेही वक्तव्य त्यांच्या वतीने करण्यात आलेले नाही.
IRGC चे वरिष्ठ अधिकारी मोहसेन रेझाई यांनी एका मुलाखतीदरम्यान बोलताना म्हटले होते की, इस्रायलकडून अणुहल्ला झाला तर पाकिस्तान त्यांचे समर्थन करेल आणि इस्रायलवर अण्वस्त्र वापरण्यास तयार असेल. हा दावा केवळ तणाव वाढवणारा नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचा विषय ठरला होता.
इराणच्या या विधानावर पाकिस्तानकडून तत्काळ प्रतिक्रिया आली. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले की, “इस्लामाबादने अशा प्रकारचे कोणतेही विधान केलेले नाही. हा दावा पूर्णतः खोटा आणि निराधार आहे.” पाकिस्तानने इराणला थेट खोटे ठरवत आपली भूमिका स्पष्ट केली आहे की, ते कोणत्याही तृतीय देशाच्या अण्वस्त्र हल्ल्याला पाठिंबा देणार नाहीत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel Iran War : इराणचे सर्वोच्च नेते खामेनेईंनी कुटुंबासह सोडले घर; वाचा नेमकं कारण काय?
इराणमधूनच एक दुसरी धक्कादायक बातमी समोर आली आहे. इराणी माध्यमांच्या माहितीनुसार, सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी सध्या त्यांच्या कुटुंबासह गोपनीय बंकरमध्ये लपले आहेत. काही अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, इस्रायलने खामेनींवर थेट हल्ला करण्याची योजना आखली होती आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी याबाबत संवाद साधण्यात आला होता. मात्र, ट्रम्प यांनी ही योजना थांबवली, असा आरोपही करण्यात आला आहे.
इराणच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलच्या हवाई आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांत २२४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच १२७७ पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्यांमुळे इराणमधील अनेक नागरी परिसर प्रभावित झाले आहेत. दुसरीकडे, इस्रायलमधील आपत्कालीन वैद्यकीय सेवा देणाऱ्या मॅगेन डेव्हिड अॅडोम (MDA) संस्थेने सांगितले की, मध्य इस्रायलमध्ये झालेल्या इराणी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे तीन जणांचा मृत्यू, तर ६७ जण जखमी झाले आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel Iran War: इराणमध्ये सत्तापालट घडवून आणण्याबद्दल इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला मोठा दावा
या हल्ल्यांमध्ये जखमींपैकी ३० वर्षीय महिलेस गंभीर दुखापत झाली आहे, तर सहाजणांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. उर्वरित ६० जण किरकोळ जखमी असून, काहींवर मानसिक धक्का बसल्याने उपचार सुरू आहेत. या हल्ल्यांमुळे इस्रायलच्या मध्यभागात आणीबाणीचे वातावरण निर्माण झाले आहे.
इराण-पाकिस्तान-इस्रायल या त्रिकोणी तणावामुळे मध्य पूर्वेत आणखी अस्थिरता वाढण्याची शक्यता आहे. इराणचा दावा आणि पाकिस्तानची प्रतिक्रीया या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेषतः पाकिस्तानच्या अण्वस्त्र धोरणावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, पाकिस्तानला भविष्यात कशा प्रकारे स्वतःची भूमिका स्पष्ट करावी लागेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दरम्यान, इराणमधील सर्वोच्च नेते खामेनींच्या सुरक्षिततेचा प्रश्नही या तणावाच्या केंद्रस्थानी आला आहे.
इराणने केलेला दावा आणि पाकिस्तानने दिलेला खंडन यामुळे सिद्ध झाले आहे की, राजकीय हेतूंनी प्रेरित असलेले वक्तव्य तणाव वाढवतात, पण वास्तव वेगळे असते. आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रत्येक देशाला संयम, स्पष्टता आणि जबाबदारीने भूमिका घेणे अत्यावश्यक आहे, अन्यथा चुकीच्या माहितीच्या आधारे निर्माण होणारे तणाव जगाला विनाशाच्या उंबरठ्यावर नेऊ शकतात.