Portuguese ship full of treasure sank at sea remains worth billions found 300 years later
Portuguese treasure ship : तीनशे वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पोर्तुगालचे एक भव्य जहाज, ‘नोसा सेनहोरा दो काबो’, गोव्यातून मौल्यवान खजिना घेऊन पोर्तुगालच्या दिशेने निघाले होते. त्या काळात गोवा पोर्तुगालची वसाहत होती, आणि भारतातून लुटलेल्या सोन्या-चांदीच्या संपत्तीचा मोठा हिस्सा समुद्रमार्गे युरोपमध्ये पोहोचवला जात होता. मात्र, या खजिन्याने भरलेल्या जहाजावर समुद्री चाच्यांनी मादागास्करजवळ हल्ला केला, आणि संपूर्ण जहाज समुद्रात बुडाले.
आता, तब्बल ३०० वर्षांनी, या ऐतिहासिक जहाजाचे अवशेष मादागास्करजवळील नोसी बोराहा बेटाजवळ सापडले आहेत. संशोधकांनी १६ वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर या जहाजाचा ठाव घेतला आहे. या अवशेषातून फक्त जहाजाचेच नाही तर इतिहासाच्या पानांतील अनेक रहस्यांचे उलगड होत आहे.
ब्रिटनच्या ‘द सन’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, ८ एप्रिल १७२१ रोजी समुद्री चाच्यांनी या पोर्तुगीज जहाजावर अचानक हल्ला केला होता. त्यावेळी हे जहाज केवळ खजिन्याने भरलेले नव्हते, तर त्यामध्ये २०० गुलामही होते, ज्यांचा आजपर्यंत काहीही पत्ता लागलेला नाही. जहाजात भारतातून आणलेले सोनं, चांदी, मौल्यवान दगड, हस्तिदंत, मोती, आणि अनेक धार्मिक वस्तू भरलेल्या होत्या. या सर्व संपत्तीची आजच्या घडीला किंमत सुमारे ११.७४ अब्ज रुपये (१०८ दशलक्ष पौंड) एवढी असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : तुर्कीची S-400 पाकिस्तानला विकण्याची योजना; काय असणार अमेरिका आणि इस्रायलची भूमिका?
पुरातत्व तज्ञांच्या मते, या जहाजातून सुमारे ३,००० हून अधिक ऐतिहासिक वस्तू सापडल्या आहेत. यामध्ये सोन्याने मढवलेल्या मूर्ती, खजिन्याच्या पेट्या, नाणी, मोत्यांचे हार, आणि हस्तिदंताच्या पट्ट्या यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, सापडलेल्या एका हस्तिदंताच्या पट्टीवर ‘INRI’ हे सोन्याच्या अक्षरांत कोरलेले आहे, जे बायबलातील येशू ख्रिस्ताच्या क्रूसवरील लेखनाशी संबंधित असल्याचे मानले जाते.
या जहाजाच्या बुडण्यामागे एक भीषण वास्तवही समोर येते – गुलामांचा व्यापार. भारतातून वसाहतवादी देशांकडे फक्त खजिना जात नव्हता, तर गरिबांना, कैद्यांना आणि अशक्त लोकांना गुलाम बनवून बंदरे, साखर कारखाने आणि खाणींमध्ये राबवण्यासाठी नेले जात होते. ‘नोसा सेनहोरा दो काबो’ या जहाजाने अशाच काही गुलामांना घेऊन प्रवास सुरू केला होता, पण तो संपला समुद्राच्या पोटात.
१७२१ मध्ये गोवा हे पोर्तुगालचे महत्वाचे वसाहतवादी केंद्र होते. इथून मोठ्या प्रमाणावर मसाले, हिरे, सोनं, चांदी आणि गुलाम यूरोपमध्ये नेले जात. ब्रिटिश भारतात आल्यानंतरही गोवा पोर्तुगिजांकडे राहिला आणि १९६१ मध्ये तो भारतात परत आला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : संयुक्त राष्ट्रांचा मोठा निर्णय! वाळू व धूळ वादळांशी लढण्यासाठी 2025-2034 हे दशक घोषित
ही घटना केवळ एक जहाज बुडाल्याची नाही, तर जगातील सर्वात मोठ्या समुद्री चाचेगिरीच्या घटनेपैकी एक ठरली आहे. त्या काळात पोर्तुगीज साम्राज्य हे भारत आणि युरोपमधील महत्त्वाच्या सागरी मार्गांवर पूर्णपणे नियंत्रण ठेवत होते. मात्र, या घटनेने त्यांच्या साम्राज्याची प्रतिमा डागाळली होती. आज ३०० वर्षांनंतर या जहाजाचे अवशेष सापडणे म्हणजे इतिहास पुन्हा उलगडण्यासारखे आहे. या खजिन्यामध्ये दडलेल्या वस्तू केवळ मौल्यवान नाहीत, तर त्या भारताच्या लुटलेल्या संपत्तीचे आणि गुलामांच्या दु:खद कहाण्यांचे साक्षीदार आहेत.