International Day to Combat Sand and Dust Storms : वाळू आणि धुळीच्या वादळांना तोंड देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी जागतिक सतर्कता जारी केली आहे. ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
International Day to Combat Sand and Dust Storms : जगभरात वाळू आणि धूळ वादळांचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे. श्वसनाचे आजार, शेतीचे नुकसान, हवामान बदल आणि वाळवंटीकरण या सगळ्यामुळे आता संयुक्त राष्ट्र संघाने याला तातडीने गांभीर्याने घेतले आहे. याच पार्श्वभूमीवर २०२५ ते २०३४ हा कालावधी “वाळू आणि धूळ वादळांशी लढण्याचे जागतिक दशक” म्हणून घोषित करण्यात आला आहे. हा ऐतिहासिक निर्णय संयुक्त राष्ट्र महासभेने नुकताच सर्वसंमतीने मंजूर केला.
या निर्णयामुळे केवळ चर्चेपुरते नव्हे, तर जागतिक स्तरावर संशोधन, उपाययोजना, आणि जागरूकता मोहीम राबवली जाणार आहे. मध्य आफ्रिकेपासून उत्तर चीनपर्यंत वादळांचे प्रभाव इतके तीव्र झाले आहेत की आरोग्य, शेती आणि आर्थिक व्यवस्थेवर त्याचा खोल परिणाम होत आहे. विशेषतः विकसनशील देशांना याचा मोठा फटका बसत आहे.
२०२२ च्या संयुक्त राष्ट्र अहवालानुसार, धूळ व वाळू वादळांची तीव्रता आणि वारंवारता झपाट्याने वाढली आहे. अंदाजानुसार दरवर्षी जवळपास २ ट्रिलियन टन वाळू आणि धूळ हवेत मिसळते, जी संपूर्ण पृथ्वीच्या हवामानावर परिणाम करते. हे वादळ केवळ श्वसन विकारांचे प्रमाण वाढवत नाहीत, तर पिके नष्ट करतात, पशुधन मारतात आणि वाळवंटीकरणाच्या प्रक्रियेला गती देतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : म्यानमारच्या युद्धाचा जागतिक परिणाम; चीनच्या धमकीने पृथ्वीच्या आतील दुर्मिळ खजिन्यावर गडद सावट
या ठरावामागे संयुक्त राष्ट्रसंघातील G77 गटाचा मोलाचा वाटा आहे. १३४ विकसनशील देश आणि चीन यांचा समावेश असलेल्या या गटाच्या वतीने युगांडाचे राजदूत गॉडफ्रे क्वाबा यांनी हा ठराव मांडला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे वाळू आणि धुळीचे नकारात्मक परिणाम कमी करणे आणि रोखणे. सभागृहात उपस्थित १९३ सदस्य देशांनी या ठरावास एकमुखाने पाठिंबा दिला, आणि सभापती डेनिस फ्रान्सिस यांनी हा ठराव ठाम स्वरात मंजूर केला.
गेल्या वर्षी संयुक्त राष्ट्र महासभेने १२ जुलै हा “आंतरराष्ट्रीय वाळू आणि धूळ वादळ लढा दिन” म्हणून घोषित केला होता. यावर्षी २०२४ मध्ये पहिल्यांदाच हा दिवस साजरा होणार असून त्याच्या अवघ्या दोन दिवस आधीच ही मोठी घोषणा करण्यात आली आहे.
1. जागतिक आरोग्याचे रक्षण: वादळांमुळे दमा, ब्राँकायटिस, अॅलर्जी सारखे आजार वाढत आहेत.
2. शेतीचे नुकसान टाळणे: मातीची उपजाऊ क्षमता कमी होते, पिके उध्वस्त होतात.
3. पर्यावरणीय समतोल राखणे: वाळवंटीकरणाला आळा घालणे आणि हवामान बदल कमी करणे.
4. जागरूकता वाढवणे: लोकांमध्ये संरक्षणाच्या उपाययोजनांची माहिती पोहोचवणे.
भारतासारख्या देशात राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा यांसारख्या राज्यांत वाळू व धूळ वादळांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे भारताला या दशकाचा वापर तांत्रिक संशोधन, जैवविविधता संरक्षण, सेंद्रिय शेती आणि नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने हवामान बदलाशी लढा देण्यासाठी करता येईल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अमेरिकेचा नवा पवित्रा! ड्रोन युद्धासाठी छोट्या लढवणार ‘ही’ शक्कल, संरक्षण सचिवांचा मोठा निर्णय
संयुक्त राष्ट्रांचा हा निर्णय म्हणजे एक जागतिक चेतावणी आहे. भविष्यातील पिढ्यांचे संरक्षण करण्यासाठी, पर्यावरणाशी सुसंवाद साधण्याची ही योग्य वेळ आहे. वाळू आणि धूळ वादळांना रोखण्यासाठी प्रत्येक देशाने, प्रत्येक नागरिकाने आपली भूमिका बजावली पाहिजे.