तुर्कीची S-400 पाकिस्तानला विकण्याची योजना; काय असणार अमेरिका आणि इस्रायलची भूमिका? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Turkey F-35 deal : पश्चिम आशियात नव्या शस्त्रस्पर्धेचा धोका निर्माण झाला आहे. तुर्कीच्या एका निर्णयामुळे अमेरिका आणि इस्रायल दोघेही अस्वस्थ झाले आहेत. तुर्कीने आपली रशियन बनावटीची S-400 हवाई संरक्षण प्रणाली पाकिस्तानला विकण्याची योजना आखली आहे आणि त्या बदल्यात अमेरिकेकडून अत्याधुनिक F-35 लढाऊ विमाने विकत घेण्याची तयारी दाखवली आहे. या प्रकरणामुळे केवळ अमेरिका नव्हे तर इस्रायललाही गंभीर चिंता वाटू लागली आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर एक गोंधळलेली स्थिती निर्माण झाली आहे. इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी अलीकडेच ट्रम्प यांचे नाव नोबेल शांतता पुरस्कारासाठी सुचवले होते. मात्र आता, F-35 विमाने तुर्कीला विकण्याच्या प्रस्तावावरून त्यांच्यावरच ताशेरे ओढले जात आहेत. इस्रायली अधिकाऱ्यांनी थेट ट्रम्प यांच्याशी संपर्क साधून आपली नाराजी व्यक्त केली आहे.
इस्रायलने स्पष्ट सांगितले आहे की, तुर्कीला F-35 विमाने देणे म्हणजे संपूर्ण मध्यपूर्वेसाठी धोका निर्माण करणे. कारण, तुर्की ही NATOची सदस्य असली तरी ती रशियाच्या अधिक जवळ गेलेली आहे. अशा परिस्थितीत, रशियाकडे F-35 संबंधित गोपनीय माहिती पोहोचण्याची भीती आहे.
तुर्कीने २०१७ मध्ये रशियासोबत 2.5 अब्ज डॉलर्सचा S-400 खरेदी करार केला होता. ही प्रणाली जगातील सर्वात प्रगत हवाई संरक्षण यंत्रणा मानली जाते. भारतानेही हीच प्रणाली खरेदी केली आहे. मात्र, नाटो आणि अमेरिकेच्या विरोधामुळे तुर्कीला F-35 लढाऊ विमानांच्या प्रकल्पातून बाहेर काढण्यात आले होते.
पण आता तुर्कीने नवीन डाव मांडला आहे. त्यांच्या योजना अशी आहे की, S-400 ही प्रणाली पाकिस्तानला विकावी आणि त्याच्या बदल्यात अमेरिकेकडून F-35 विमाने विकत घ्यावीत. मात्र, S-400 ही रशियन बनावटीची प्रणाली असल्याने, ती तिसऱ्या देशाला विकण्यासाठी तुर्कीला रशियाची परवानगी घ्यावी लागणार आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : संयुक्त राष्ट्रांचा मोठा निर्णय! वाळू व धूळ वादळांशी लढण्यासाठी 2025-2034 हे दशक घोषित
‘डिफेन्स सिक्युरिटी एशिया’च्या अहवालानुसार, इस्रायलला भीती वाटते की तुर्की F-35 मिळवल्यास, रशियाला या लढाऊ विमानांच्या क्षमतांबद्दल महत्त्वाची माहिती मिळू शकते. यामुळे, रशिया भविष्यात या विमानांच्या विरोधात अधिक प्रभावी संरक्षण यंत्रणा विकसित करू शकेल. याचा थेट परिणाम इस्रायलच्या हवाई सुरक्षेवर होऊ शकतो.
इस्रायली अधिकाऱ्यांनी ट्रम्प यांना सांगितले आहे की, तुर्कीला F-35 विकणे म्हणजे इस्रायलला आणि इतर मित्र राष्ट्रांना धोक्यात टाकणे. एकीकडे अमेरिका आणि इस्रायलचे मजबूत धोरणात्मक संबंध आहेत, आणि दुसरीकडे, अशा निर्णयामुळे तेच संबंध धोक्यात येण्याची शक्यता आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : म्यानमारच्या युद्धाचा जागतिक परिणाम; चीनच्या धमकीने पृथ्वीच्या आतील दुर्मिळ खजिन्यावर गडद सावट
अमेरिकेची स्थिती सध्या फारच नाजूक आहे. एकीकडे तिला तुर्कीला सामोरे जावे लागते, जी NATOची भागीदार आहे; दुसरीकडे, इस्रायलसारखा विश्वासू मित्र देश नाराजी व्यक्त करत आहे. तुर्कीला F-35 देणे म्हणजे इस्रायलशी असलेली रणनीती मोडीत काढणे, आणि न देणे म्हणजे तुर्कीला रशिया वा चीनकडे झुकण्यास प्रवृत्त करणे. यामुळे अमेरिकेला फारच संतुलित धोरण राबवावे लागणार आहे. ट्रम्प किंवा अमेरिकेच्या सध्याच्या नेतृत्वाने याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही, पण ही बाब भविष्यात जागतिक संरक्षण समीकरणांवर दूरगामी परिणाम करू शकते.